मेट्रो सफारीसाठी आता जुलै २०२० चा मुहूर्त!

मेट्रो सफारीसाठी जुलै २०२० चा मुहूर्त!
मेट्रो सफारीसाठी जुलै २०२० चा मुहूर्त!

मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळ रखडलेल्या सिडकोच्या मेट्रो-१ चे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी नवी मुंबईकरांना जुलै २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. सिडकोतर्फे मेट्रो रेल्वेसाठी तयार केलेल्या पुलावरून ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यावर नोव्हेंबर ते डिसेंबरच्या आधी चाचणी घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र रेल्वेस्थानकांच्या अर्धवट कामांमुळे ट्रॅकजोडणीचे काम पूर्ण न झाल्यामुळे या चाचण्या निश्‍चित केलेली मुदत ओलांडण्याची शक्‍यता सिडकोच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे विधानसभेच्या आचारसंहितेआधीच मेट्रोची चाचणी घेण्याचे राज्य सरकारचे स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे.  

अडथळाविरहित हक्काची जमीन, पुरेसे आर्थिक पाठबळ या दोन्ही जमेच्या बाजू असूनही फक्त प्राधान्यक्रम नसल्यामुळे सिडकोने सहा वर्षांपूर्वी सुरू केलेली मेट्रो आत्तापर्यंत फक्त ट्रॅकपर्यंतच मर्यादित राहिली आहे. बेलापूर ते पेंईधर या ११ कि.मी.च्या मार्गावर सिडकोला ९९ टक्के ट्रॅकचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. या मार्गावरील ११ रेल्वेस्थानके सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतरही अद्याप पूर्ण करण्यात सिडकोच्या अभियंत्यांना अपयश आले आहे. मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत सिडकोचे तीन व्यवस्थापकीय संचालक बदलून गेले आहेत. जुने कंत्राटदार दिवाळखोरीत निघाल्याने सिडकोने नव्या कंत्राटदारांच्या खांद्यावर रेल्वेस्थानकांच्या कामांची जबाबदारी सोपवली आहे. 

मेट्रोच्या ११ स्थानकांपैकी सिडकोने १ ते ६ मेट्रो स्थानकांच्या कामांसाठी प्रकाश कन्सोरियम यांना १२७ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. ७ व ८ क्रमांकाचे मेट्रो स्थानकाचे काम ‘बिल्ड राईड’ या कंत्राटदारामार्फत सुरू आहे. ८ व ११ रेल्वेस्थानकाचे ४३ कोटी रुपयांचे काम यूनिवास्तू यांना; तर १० क्रमांकाचे मेट्रो स्थानक तयार करण्याचे ५३ कोटी रुपयांचे काम जे. कुमार यांना देण्यात आले आहे. सिडकोने उड्डाणपूल तयार करून त्यावर रेल्वे ट्रॅकही बसवण्यात आला आहे. मात्र रेल्वेस्थानकांची कामे पूर्ण नसल्याने ११ रेल्वेस्थानकांदरम्यान १५० मीटरपर्यंतचे रेल्वे ट्रॅक जोडण्यात अडचणी येत आहेत. हे ट्रॅक एकमेकांना जोडले नसल्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना मेट्रोची चाचणी घेताना अडचणी येत आहेत.   

खर्चात वाढ 
नवी मुंबईच्या मेट्रो मार्गाचे काम लांबणीवर पडल्यामुळे दोन हजार कोटींमध्ये होणारे काम आता तीन हजार कोटींमध्ये सिडकोतर्फे पूर्ण केले जाणार आहे. यापैकी ११ किलो मीटरचा रेल्वे उड्डाणपूल, वीजजोडण्या, सिग्नल यंत्रणा, मेट्रोची कारशेड आदी दोन हजार कोटींची कामे सिडकोने पूर्ण केली आहेत. मात्र रेल्वेस्थानकांचे बांधकाम व अंतर्गत सजावटीसाठी आणखी एक हजार कोटींचा खर्च सिडकोला अपेक्षित आहे.

८ ऑगस्टला चीनहून २ मेट्रो ट्रेन
सिडकोने नवी मुंबई मेट्रोकरीता चीनहून खास डब्बे तयार करून घेतले आहेत. एकूण ८ ट्रेन मेट्रोच्या ताफ्यात येणार आहेत. त्यापैकी दोन ट्रेन याआधीच तळोजाच्या कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. उर्वरीत तीन ट्रेन ८ ऑगस्टला चीनहून समुद्रामार्गे भारताकडे रवाना होणार आहेत. २० दिवसांचा प्रवास करून सप्टेंबर अखेरीस भारताच्या बंदरात दाखल होणार आहेत. त्यानंतर उर्वरीत तीन ट्रेन सप्टेंबरला निघाल्यावर ऑक्‍टोबर अखेरीस भारतात येतील असा अंदाज सिडकोतर्फे वर्तवण्यात येत आहे.

पुन्हा मुहुर्त टळणार 
विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता असल्याने सिडकोने सप्टेंबरमध्ये चाचणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, रेल्वेस्थानके एकमेकांना न जोडल्यामुळे ही चाचणी डिसेंबर २०१९ नंतर होण्याची चिन्हे आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात चाचणी झाल्यावर प्रत्येक चाचणीची माहिती भारतीय रेल्वेच्या अनुसंधान अभिकल्प विभागाला देणे बंधनकारक आहे. चाचणीचा अहवाल तपासल्यानंतर संबंधित प्राधिकरणातर्फे सिडकोला वेगाचे प्रमाणपत्र दिले जाते. तसेच त्यांच्या एका पथकाकडून पुन्हा मेट्रोची चाचणी घेतली जाते. ही चाचणी यशस्वी ठरल्यानंतर तो अहवाल रेल्वे सुरक्षा आयोगाकडे पाठवला जातो. या आयोगाकडून जेव्हा सुरक्षा प्रमाणपत्र सिडकोला मिळेल, तेव्हा प्रत्यक्षात या रेल्वेतून लोकांना प्रवास करण्यासाठी परवानगी मिळते. या सर्व सोपस्कारासाठी सहा महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने प्रत्यक्षात नवी मुंबईच्या मेट्रोची सफर करण्यासाठी २०२० जुलैपर्यंतचा दिवस उजडेल, असा अंदाज सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com