मेट्रो स्थानकांवरील वन रूपी क्लिनिक सेवा रखडली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई - मेट्रोच्या हायटेक स्थानकांवर वन रूपी क्‍लिनिक सेवा सुरू करण्याचे आश्‍वासन रिलायन्स कंपनीच्या महाव्यवस्थापकांनी वर्षभरापूर्वी दिले होते; मात्र अद्यापही वैद्यकीय सेवा सुरू झालेली नसल्याने मेट्रो प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई - मेट्रोच्या हायटेक स्थानकांवर वन रूपी क्‍लिनिक सेवा सुरू करण्याचे आश्‍वासन रिलायन्स कंपनीच्या महाव्यवस्थापकांनी वर्षभरापूर्वी दिले होते; मात्र अद्यापही वैद्यकीय सेवा सुरू झालेली नसल्याने मेट्रो प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.

रेल्वेने प्रवास करताना दिवसाला अनेक अपघात होतात. म्हणून प्रवासी संघटनांनी स्थानकांवर वैद्यकीय सेवा पुरवण्याची मागणी केली होती. त्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने रेल्वे विभागाला स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वन रूपी क्‍लिनिक अनेक रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आले; मात्र हायटेक मेट्रोची सेवा मात्र अद्यापही रखडलेलीच आहे. वर्षभरापूर्वी वन रूपी क्‍लिनिक सेवा पुरवण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते; मात्र वर्ष संपत आले तरी अद्याप प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे दिसते. शनिवारी (ता. २३) अंधेरी मेट्रो स्थानकावर एका महिलेला चक्कर येऊन पडल्यानंतर १५ मिनिटे उपचार मिळू शकले नाहीत. मेट्रोच्या महाव्यवस्थापकांनी एक वर्षापूर्वी मॅजिक दिल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुलेंशी चर्चा करून सर्व स्थानकांवर वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

मेट्रो स्थानकांवर वन रूपी क्‍लिनिक सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपत्कालीन स्थितीत मेट्रो स्थानकांवर वैद्यकीय सेवेची गरज आहे. त्यामुळे रेल्वेच्या धर्तीवर मेट्रोनेही वैद्यकीय सेवा सुरू करायला हवी; मात्र मेट्रो महाव्यवस्थापकांनी अद्याप सकारात्मक भूमिका दाखवली नसल्याने सेवा रखडली, असे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.

जागेच्या अभावामुळे अडचण
मेट्रो स्थानकांवरील संगणकीकृत सुरक्षा महत्त्वाची आहे. स्थानकांवरील प्रथमोपचार खोल्यांमध्ये प्राथमिक मदत किट, स्ट्रेचर, व्हीलचेअर आदी सगळे साहित्य आहे. स्टेशन कर्मचारी प्रथमोपचारासाठी प्रशिक्षित आहेत. रुग्णालये आणि रुग्णवाहिका सेवासुद्धा उपलब्ध आहे. अनेक वेळा रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले आहे; मात्र स्थानकावर जागेच्या अभावामुळे इतर वैद्यकीय सेवा पुरवणे शक्‍य नाही, असे मेट्रोच्या प्रवक्‍त्यांनी सांगितले.

Web Title: Metro Station One Rupee Clinic Service Stop