चालकाशिवाय धावणार मेट्रो 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

आर्टिफिशल इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेटिंग नेटवर्कचा वापर 

मुंबई : मुंबईत सार्वजनिक वाहतुकीचा ताण हलका करण्यासाठी मेट्रोचा विस्तार सुरू आहे. मेट्रो प्रकल्पासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला जात असून चालकविरहित मेट्रोसेवा राबविण्यात येणार आहे. महामुंबईतील मेट्रो रेल्वे 2025 नंतर चालकविरहित होणार आहे. त्यासाठी प्रत्येक स्टेशनला विशिष्ट कोड देण्यात येणार असून आर्टिफिशल इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेटिंग नेटवर्कचा वापर करण्यात येणार आहे. मेट्रोचे 337 किलो मीटरचे सर्व टप्पे 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता असून प्रत्येक मार्गावर सुरवातीला तीन वर्षे चाचणी घेण्यात येणार आहे. 

घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या पहिल्या टप्प्यावर मेट्राचालकांमार्फत चालवली जाते; तर दहिसर पूर्व ते डी. एन. नगर (अंधेरी पश्‍चिम) आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व हे दोन टप्पे लवकरच पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. सुरुवातीला या तिन्ही मार्गावरील मेट्रो चालवण्यासाठी चालक असतील; मात्र ही मेट्रो चालकरहितही चालवता येईल. त्यानंतर 2022 पर्यंत मेट्रोचे महामुंबईतील 337 किलोमीटरचे मार्ग पूर्ण झाल्यावर तसेच प्रमुख नियंत्रण कक्ष असलेल्या मेट्रो भवनाचे काम पूर्ण झाल्यानंतर या सर्व मेट्रो रेल्वे गाड्या चालकरहित असतील. 

अंधेरी ते दहिसर या दोन मार्गाचे चालकरहित डबे बनवण्याचे कंत्राट अर्थ मुव्हर्स लिमिटेडला दिले असून पहिला डबाही मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाला मिळाला आहे. ही कंपनी 500 डबे तयार करणार आहे. कुलाबा ते सिप्झ या तिसऱ्या टप्प्यासाठी चालकविरहित कोच बनवण्याचे कंत्राट अल्स्टॉम कंपनीला दिले आहे. सुरुवातीचे काही दिवस ट्रायल सुरू असतेवेळी ही चालकासह चालविली जाणार आहे. यशस्वी चाचणीनंतर मेट्रो 3 ही वाहनचालकरहित चालविली जाणार आहे. 

सिग्नल सिस्टीमवरून नियोजन 

सुरवातीला प्रत्येक टप्प्याची तीन वर्षे चाचणी घेण्यात येणार आहे. यात काही ठिकाणी चालक केबिनमध्ये उपस्थित असेल; मात्र गाडी स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित होईल. तीन वर्षे चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्व मार्ग चालकरहित करण्यात येणार आहे. यात प्रत्येक स्थानकाला कोड देण्यात येणार आहे. सिग्नल सिस्टीमवरून या ट्रेनचे नियोजन करता येणार आहे. त्यानुसार प्रमुख नियंत्रण कक्षातून त्या गाडीचे नियंत्रण करता येऊ शकते. तसेच प्रत्येक स्थानकावरही नियंत्रण कक्ष असेल. त्यातूनही नियंत्रण करणे शक्‍य होणार आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro will run without driver