मेट्रोला आता ऑक्‍टोबरचा मुहूर्त

मेट्रोला आता ऑक्‍टोबरचा मुहूर्त

नवी मुंबई - कंत्राटदारांच्या वादामुळे गेल्या वर्षभरापासून नवी मुंबईच्या वाहतुकीसाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या मेट्रोचे काम रखडले होते. आता ते नवीन कंत्राटदारामार्फत पुन्हा नवीन जोशात सुरू झाले आहे. त्यामुळे या शहरात पहिली मेट्रो ऑक्‍टोबर २०१९ पासून धावेल, असा विश्‍वास सिडकोकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

बेलापूर ते पेंधर दरम्यानच्या ११ किलोमीटर अंतरावरील उन्नत मार्ग, पेंधर येथील कारशेड आणि स्थानके तयार करण्याचे काम सिडकोमार्फत विविध कंत्राटदार कंपन्यांना देण्यात आले होते. त्यापैकी सिडकोला कारशेड आणि उन्नत मार्ग वेळेत तयार करण्यात यश आले; मात्र रेल्वेस्थानकांचे काम मागे पडल्याने तब्बल सहा वर्षांनंतरही मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊ शकला नाही. 

स्थानकांचे काम रखडल्याने सिडकोने सॅजोन्श, सुप्रिम आणि महावीर या तीन भागीदार कंपन्यांची हकालपट्टी करून हे काम पूर्ण करण्यासाठी दुसरे कंत्राटदार नेमले आहेत. ११ स्थानकांपैकी सिडकोने १ ते ६ मेट्रो स्थानकांच्या कामांसाठी प्रकाश कन्सोरियम यांना १२७ कोटींचे काम दिले आहे. ७ व ८ क्रमांकाचे स्थानकाचे काम बिल्ड राईड करणार आहे. त्याला हे काम २८ कोटींना देण्यात आले आहे. ८ व ११ रेल्वेस्थानकांचे ४३ कोटींचे काम युनिवास्तू यांना, १० क्रमांकाचे स्थानक तयार करण्याचे ५३ कोटींचे काम जे. कुमार यांना देण्यात आले आहे. 

सिडकोने नेमलेल्या नव्या कंत्राटदार कंपन्यांनी गेल्या आठवड्यापासूनच कामाला सुरुवात केली आहे. त्यांना हे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोकडून नवीन मुदत दिली आहे. 

प्रत्येक कंत्राटदाराने त्याच्या वाट्याला आलेले काम वेळेत पूर्ण केले, तर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पेंधर ते बेलापूर ही सेवा ऑक्‍टोबर २०१९ पर्यंत सुरू होईल, अशी शक्‍यता सिडकोचे (मेट्रो विभाग) वरिष्ठ अभियंता दीपक हरताळकर यांनी वर्तवली आहे. 

दृष्टिक्षेप 
    मेट्रोच्या पायाभरणीच्या कामापासूनच सिडको प्रशासनाकडून दिरंगाई झाली.
    मेट्रोच्या प्रस्तावानुसार डिसेंबर १४ ही अंतिम मुदत देण्यात आली होती.
    निविदा प्रक्रिया होईपर्यंत ऑगस्ट २०१४ उजाडले.
    डिसेंबर २०१७ नवीन मुहूर्त देण्यात आला.
    कंत्राटदारांच्या न्यायालयीन वादामुळे हा मुहूर्त टळला.
    आता ऑक्‍टोबर २०१९ हा नवीन मुहूर्त देण्यात आला आहे. 

फेब्रुवारीत येणार डब्बे
नवी मुंबईच्या मेट्रोसाठी डब्बे व तांत्रिक मदतीसाठी चीनमधील एका कंपनीला कंत्राट दिले आहे. त्यानुसार फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये मेट्रोचे सहा डबे दाखल होणार आहेत; तर उर्वरित डबे मे महिन्याच्या अखेरपर्यंत येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

काय होता न्यायालयीन वाद
बेलापूर ते पेंधर या मेट्रोच्या मार्गावर रेल्वेस्थानके तयार करण्यासाठी सिडकोने काम विभागून दिले. पहिल्या टप्प्यात १ ते ६ स्थानकांचे काम मे. सॅन्जोस-महाविर-सुप्रिम या कंपनीला भागीदारी स्वरूपात देण्यात आले होते. यापैकी १ ते ६ पर्यंतच्या मेट्रो स्थानकांची मुदत ३१ ऑगस्ट २०१२ ते ३० जून २०१४ अशी एकूण २२ महिने होती. या कालावधीत संबंधित कंत्राटदार कंपनीने अवघे ३२ टक्के काम केले. परंतु मुदत संपल्यानंतरही कंपनीने ५६.७ टक्के काम पूर्ण केल्याचे सिडकोला आढळून आले होते. कंत्राटदार कंपनी अडचणीत सापडल्यामुळे पुन्हा मुदत दिल्यानंतरही या कामाबाबत सिडकोला शंका होती. त्यामुळे सिडकोने या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यावर सिडको  ठाम राहिली. त्यामुळे संबंधित कंपनीने सिडकोविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. हा पेच आता सुटला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com