ठाण्यातील मेट्रोचे काम रखडणार? 

ठाण्यातील मेट्रोचे काम रखडणार? 

ठाणे : बहुचर्चित वडाळा ते ठाणे या मेट्रो मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यासह मुंबईतील अनेक शहरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अशा वेळी मेट्रोचे काम भविष्यात अधिक रखडण्याचे चिन्हे असताना घोडबंदर रोड येथे उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. हा विरोध असाच कायम राहिल्यास भविष्यात मेट्रोच्या एकूण नियोजनाला त्याचा फटका बसणार आहे. 

ठाण्यातील ओवळा मोघरपाडा येथे खारभूमी परिसर असून जुना सर्व्हे क्र. 28 (नवीन सर्व्हे क्र. 30) येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून शेतकरी भातशेती करतात. एकूण 187 कुटुंबे येथे शेती करत आहेत. प्रत्यक्षात आजही शेती करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. काही नागरिक येथे खाडीकिनारी मासेमारी करायचे. खाडीचे भरती-अहोटीचे पाणी शेतात येत असल्यामुळे भातशेतीचे नुकसान व्हायचे. त्यामुळे 1960 साली तत्कालीन सरकारने शेतकऱ्यांना येथे एक बंधारा बांधायला लावला. यामुळे जमिनीचे रक्षण होऊन शेतीचे क्षेत्र वाढले. 1960 मध्ये 167 नागरिकांना भातशेती करण्यासाठी प्रत्येकी 64 गुंठे जागा सरकारकडून देण्यात आली. इतरांना भातशेती करण्यासाठी त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी तोंडी येथील जमीन दिली; पण कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाची नोंद सरकारदरबारी पुढे झाली नाही. आजही येथे शेतकरी भातशेती करत असून त्यावर नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो. 

मेट्रो प्रकल्पासाठी "एमएमआरडीए'ने कारशेडचे आरक्षण ओवळा मोघरपाडा येथील खारभूमी जागेत टाकले आहे. या कारशेडसाठी सुमारे शंभर एकर जागा एमएमआरडीएला हवी आहे. येथे जागेच्या सर्व्हेसाठी एमएमआरडीएचे अधिकारी या ठिकाणी आज आले असता शेकडो शेतकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. अधिकारी आल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक देखील या ठिकाणी पोचले होते. त्यांनीही शेतकऱ्यांना भरपाई देईपर्यंत काम करण्यास विरोध केला. "एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी आज सर्वेक्षणासाठी येण्यापूर्वी कोणतीही नोटीस दिली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जर ही जमीन कारशेडला दिली, तर शेतकऱ्यांनी उपजीविका कशी करायची, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

समाधान करा, न्याय द्या... 
मेट्रो कारशेडसाठी ओवळा-मोघरपाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी "एमएमआरडीए'ला हव्या आहेत; पण शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे पूर्ण समाधान करा, त्यांना न्याय द्या आणि मगच पुढे कारशेडचे काम सुरू करा, अशी भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या या भूमिकेला स्थानिक लोकप्रतिनिधींकडूनही पाठिंबा मिळत असल्याने हा वाद अधिक चिघळण्याची शक्‍यता आहे. 

ओवळा मोघरपाडा येथे वर्षानुवर्षे लोक शेती करतात. त्या सर्व शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. आधी त्यांच्या नावावर त्या जमिनी सरकारने करून द्याव्यात. मेट्रो प्रकल्प हा जरूर व्हायला हवा. आम्हीच सरकारकडे पाठपुरावा करून ही मेट्रो शहरासाठी आणली; पण त्याच वेळी सरकारी अधिकाऱ्यांनी सगळ्यांना न्याय द्यावा. विकासाच्या या प्रक्रियेत स्थानिक लोक भरडून जायला नको. 
- प्रताप सरनाईक, 
आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com