मुंबईत आणखी सहा लाख घरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

मुंबई - सरकारने "म्हाडा'ला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर "म्हाडा'कडे आतापर्यंत इमारत परवानगी, सुधारित नकाशे मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र आदींसाठी 60 प्रस्ताव आले आहेत. यातून "म्हाडा'ला मुंबईत सहा लाख नव्या घरांच्या निर्मितीची अपेक्षा आहे.

मुंबई - सरकारने "म्हाडा'ला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर "म्हाडा'कडे आतापर्यंत इमारत परवानगी, सुधारित नकाशे मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र आदींसाठी 60 प्रस्ताव आले आहेत. यातून "म्हाडा'ला मुंबईत सहा लाख नव्या घरांच्या निर्मितीची अपेक्षा आहे.

"म्हाडा'च्या बृहन्मुंबई क्षेत्रामधील 114 अभिन्यासांच्या जमिनीवरील नियोजन प्राधिकरणाचे अधिकार "म्हाडा'ला मिळाल्यामुळे पुनर्विकासाची प्रक्रिया वेगाने होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे रहिवाशांना नवी घरे मिळतीलच; पण परवडणाऱ्या सदनिकांच्या निर्मितीला वेग येईल. यातून सहा लाख नव्या सदनिका उपलब्ध होण्याची शक्‍यता आहे, असे "म्हाडा'ने कळविले आहे.

सरकारने यावर्षी 23 मे रोजी अधिसूचना काढून "म्हाडा'ला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला. त्यानंतर, "म्हाडा'च्या जुन्या वसाहतीतील इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांच्या मंजुरीसाठी अभिन्यास मंजुरी (लेआउट अप्रूव्हल) कक्ष, बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी (बिल्डिंग परमिशन) कक्ष व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत इमारत प्रस्ताव परवानगी असे स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
इमारत प्रस्ताव परवानगी कक्षामार्फत नेहरूनगर, कुर्ला येथील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेला नुकतेच भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. अन्य सहा इमारतींच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित प्रस्तावांची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. या परवानग्या ऑनलाइन पद्धतीने मिळाव्यात, यासाठी मुंबई महापालिकेच्या अनुभवी अभियंत्यांची मदत घेण्यात येणार आहे.

Web Title: mhada 6 lakh homes