
MHADA : म्हाडा औरंगाबाद मंडळातर्फे घरांसाठी ऑनलाइन सोडत जाहीर
मुंबई : म्हाडाच्या औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) व म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथे उभारलेल्या ८४९ सदनिका व ८७ भूखंडांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने गुरुवारी काढण्यात आली.
या सोडतीसाठी २२२५ अर्जदारांनी अनामत रक्कम भरून अर्ज सादर केले. सदर सोडतीसाठी अर्जदारांकडून कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन संकेतस्थळ व अँपद्वारे मागविण्यात आली. सदर कागदपत्रे स्वयंचलित यंत्रणेने तपासून सोडतीसाठी अर्जदारांची पात्रता निश्चित करण्यात आली. अशाप्रकारे सोडतीसाठी पात्र अर्जदारांमधून सदनिका विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली.