217 घरांसाठी 46 हजार अर्ज 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 एप्रिल 2019

म्हाडाच्या मुंबईतील मिनी सोडतीतील 217 सदनिकांसाठी आतापर्यंत 46 हजार अर्ज दाखल झाले आहेत. यात 26 हजार 825 जणांनी अनामत रक्कमही जमा केली आहे.

मुंबई - म्हाडाच्या मुंबईतील मिनी सोडतीतील 217 सदनिकांसाठी आतापर्यंत 46 हजार अर्ज दाखल झाले आहेत. यात 26 हजार 825 जणांनी अनामत रक्कमही जमा केली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे सोडतीची तारीख 2 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे 24 मेपर्यंत अर्ज आणि अनामत रक्कम भरता येणार असल्याने सोडतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

चेंबूर सहकार नगर आणि पवईतील कोपरी गावातील सदनिकांसाठी म्हाडाने ही मिनी सोडत काढली आहे. यात अल्प आणि मध्यम गटातील सदनिका आहेत. 170 अल्प आणि 47 मध्यम गटातील या सदनिकांसाठी अनुक्रमे 20 हजार आणि 30 हजार अनामत रक्कम भरावी लागत आहे. "वन टाईम डिपॉझिट' करणाऱ्या इच्छुक ग्राहकांना 10 सदनिकांसाठीही अर्ज भरता येईल. यासाठी ऑनलाईन प्रक्रियेत दुरुस्ती करता येईल का, याची चाचपणी म्हाडाचे अधिकारी करत आहेत. यंदाच्या ते शक्‍य न झाल्यास आगामी सोडतीत अशी सुविधा सुरू करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: Mhada Mumbai mini-lottery 46 thousand applications for 217 houses

टॅग्स