अनधिकृत बांधकामांना म्हाडाची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

126 बांधकामांवर लवकरच हातोडा 

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) मुंबई आणि परिसरातील एकूण 126 अनधिकृत बांधकामांना नोटीस बजावली आहे. या अनधिकृत बांधकामांवर लवकरच हातोडा चालविला जाणार आहे. यात रुग्णालयांपासून सर्वच प्रकारच्या बेकायदा बांधकामांचा समावेश आहे. कारवाईदरम्यान पोलिस संरक्षण मिळावे यासाठी म्हाडाने सुमारे साडेतीन लाख रुपये पोलिस खात्यात जमा केले आहेत. यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

1962 ते 1971 दरम्यान, म्हाडाने मुंबई आणि परिसरात म्हाडाच्या जमिनीवर निवासी वसाहतींची निर्मिती केली होती. या म्हाडा वसाहतींमध्ये मोकळ्या जागांवर आणि निवासी गाळ्याचे म्हाडाच्या परवानगीशिवाय व्यावसायिक गाळ्यांमध्ये रूपांतर करून लाखोंचा नफा मिळवल्याची बाब म्हाडाच्या पाहणीत आढळून आली.

200 ते 250 चौ. फुटांच्या मूळ गाळ्यांमध्ये अनधिकृतरित्या वाढ करत, रुग्णालये, गोडाऊन, वॉशिंग सेंटर, दुकाने, खासगी संस्था अशा स्वरूपाची बांधकामे करण्यात आली आहेत. या अनधिकृत बांधकांमामुळे म्हाडाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याने या अनधिकृत बांधकांमावर हातोडा चालविण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. तत्पूर्वी संबंधितांना म्हाडाने कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. यात सर्वाधिक अनधिकृत बांधकाम म्हाडाच्या विक्रोळी परिसरातील वसाहतींमध्ये आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आवश्‍यक पोलिस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. पोलिस संरक्षणासाठीचे लागणारे शुल्कही म्हाडाने अदा केले आहे; परंतु गेल्या काही दिवसांपूर्वीच्या विधानसभा निवडणूक, अयोध्या निकाल आणि तत्सम कारणांमुळे पोलिस संरक्षण उपलब्ध झाले नव्हते. पोलिस संरक्षण उपलब्ध होताच म्हाडाकडून अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविला जाईल. 
- दिलीप गर्जे, उप-मुख्य अभियंता, कुर्ला प्रभाग, म्हाडा 

म्हाडाच्या जमिनीसह काही ठिकाणी मुंबई महापालिकेच्या रस्त्यांवरही अतिक्रमण असल्याचे म्हाडाच्या पाहणीत आले आहे. म्हाडाने अशा बांधकामांची यादी पालिकेकडे वर्ग केली आहे. म्हाडाने या बांधकामांना कारवाईबाबतची नोटीस बजावली असून, पालिकेच्या अख्यत्यारित येणाऱ्या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामांबाबत मुंबई महापालिकेच्या वतीनेही नोटीस दिली जाईल. त्यानंतर या बांधकांमावर हातोडा चालविला जाईल. 
- संतोष धोंडे, सहआयुक्त, मुंबई महापालिका, कुर्ला प्रभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MHADA Notice to Unauthorized Construction