म्हाडाच्या अर्जदाराला तब्बल नऊ वर्षांनंतर पैसे परत मिळणार!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

म्हाडाच्या सोडतीत सदनिका मिळाल्यानंतर अपात्र ठरलेल्या अर्जदाराला नऊ वर्षांनंतर त्याचे पैसे परत मिळणार आहेत. 

मुंबई: म्हाडाच्या सोडतीत सदनिका मिळाल्यानंतर अपात्र ठरलेल्या अर्जदाराला तीन लाखांची रक्कम चार आठवड्यांत परत करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाला दिला. त्यामुळे या अर्जदाराला नऊ वर्षांनंतर त्याचे पैसे परत मिळणार आहेत. 
म्हाडाने २०१० मध्ये काढलेल्या सोडतीत याचिकादाराला सदनिका मिळाली होती.

सदनिका मंजूर झाल्याची प्राथमिक रक्कम म्हणून सुमारे तीन लाख रुपये त्याने म्हाडाकडे जमा केले होते. परंतु, म्हाडाने २०१२ मध्ये केलेल्या तपासणीत या अर्जदाराची त्याच परिसरात एक सदनिका असल्याचे उघड झाले. त्यामुळे म्हाडाने नोटीस बजावून त्याला मंजूर केलेली सदनिका रद्द केली. त्यासाठी भरलेली रक्कम परत करण्याची मागणी याचिकादाराने केली; मात्र म्हाडाने नकार दिला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. ए. के. कुरेशी आणि न्या. एस. जे. काथावाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

अर्जदाराने भरलेली रक्कम म्हाडाने विनाव्याज चार आठवड्यांत परत करावी. तसे न केल्यास आठ टक्के व्याजाने रक्कम द्यावी, असा आदेशही खंडपीठाने दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mhada refund money to applicant after 9 year ago