म्हाडाला २००० कोटींचा फटका

mhada
mhada

मुंबई : ओशिवरा येथील म्हाडाच्या जमिनीचा गैरवापर केल्याप्रकरणी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. या गैरव्यवहारात म्हाडाचे सुमारे २००० कोटींचे नुकसान झाले आहे. बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई होईल आणि रहिवाशांना न्याय दिला जाईल, असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले.

मुंबईतील ओशिवरा परिसरातील ९५०० चौरस मीटरच्या भूखंडावर विकासक आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अधिकाऱ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे आणि बनावट सदस्य बनवून मिलेनियम कोर्ट को-ऑप. हाऊसिंग सोसायटी तयार करून महागडे फ्लॅट बांधले. विकासकाने या सदनिका विकून म्हाडाला सुमारे २००० कोटींचा गंडा घातला आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश असूनही, अधिकारी केवळ धूळफेक करत असल्याचा आरोप 
होत आहे. 

विकासक शाहीद खान याने ओशिवरा येथील सर्व्हे क्रमांक ३३ सोबत क्रमांक ८ चीही बनावट कागदपत्रे आणि ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ बनवून सीटीएस नं. ९, ३३-१०, ३५-४, सीटीएस नं. १३ आणि १५ असा एकत्रित ९५०० चौरस मीटरचा भूखंड हडप केल्याचा आरोप आहे. या भूखंडावर मर्क्‍युरी आणि मिलेनियम अशा गगनचुंबी इमारती बांधण्यात आल्या आहेत. या प्रकरणी जमीनीचे मूळ वारसदार झुबेर इब्राहिम, हुमायून अब्दुल रजाक, मसूद अब्दुल रजाक यांच्यासह मालकी हक्क असलेल्या २१ जणांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. 

या प्रकरणात उच्च न्यायालयाने मूळ वारसदारांच्या बाजूने निकाल देत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. गृहनिर्माण मंत्र्यांसह म्हाडाच्या अध्यक्षांनीही दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत;  परंतु चौकशी सुरू असल्याचे सांगत अद्याप म्हाडा प्रशासनाने गुन्हा दाखल केलेला नाही.

आदेश डावलून ‘ओसी’
या वादग्रस्त भूखंडावरील इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मंजूर करू नये, असा आदेश म्हाडा अध्यक्षांनी दिला होता; परंतु म्हाडाचे वांद्रे विभागाचे निवासी कार्यकारी अभियंता, मुंबई विभागाचे कार्यकारी अभियंता आणि म्हाडा विशेष प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी मिलेनियम को-ऑप. हाऊसिंग सोसायटीला भोगवटा प्रमाणपत्रही मंजूर केले आहे.

ओशिवरा जमीन गैरव्यवहार प्रकरण गुंतागुंतीचे असल्याने सविस्तर चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.
- उदय सामंत, अध्यक्ष, म्हाडा 

संबंधित अधिकाऱ्यांचा या गैरव्यवहारात हात आहे का, याची चौकशी करू. दोषी ठरलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. हे प्रकरण गंभीर असून, सर्व कागदपत्रांची पुन्हा छाननी करणार आहोत. 
- मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष, म्हाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com