म्हसळ्यातील पर्जन्यमापक केंद्र सदोष

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

घरे व झाडे यांच्या उंचीच्या चौपट अंतराच्या आत पर्जन्यमापक बसवू नये. प्रत्येक ठिकाणी वाहणाऱ्या जोराच्या वाऱ्यापासून तो संरक्षित असावा.

म्हसळा (वार्ताहर) : घरे व झाडे यांच्या उंचीच्या चौपट अंतराच्या आत पर्जन्यमापक बसवू नये. प्रत्येक ठिकाणी वाहणाऱ्या जोराच्या वाऱ्यापासून तो संरक्षित असावा. पर्जन्यामापक कधीही उतार असलेल्या जमिनीवर, इमारतींच्या गच्चीवर, भिंतीवर किंवा छपरावर बसवू नये अशा स्पष्ट तांत्रिक सूचना असूनही म्हसळा तालुक्‍याचे मुख्य पर्जन्यमापन केंद्र सदोष व तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या ठिकाणी आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन नेहमी चुकत असते.

म्हसळाचे सरासरी पर्जन्यमान किमान ३३०० ते ३५०० मि.मि. व कमाल ४५०० मि. मि. असल्याचे कृषी व महसूल विभागाच्या तालुक्‍यातील नोंदणीत आहे. या वर्षी म्हसळ्यातील पावसाची नोंद ४९८७ मि.मि आहे. नोंदीपेक्षा वास्तव्यात तो जास्त पडला असावा, असा जाणकारांचा अंदाज आहे. तालुक्‍यात मंडलनिहाय म्हसळा व खामगाव या दोन ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे आहेत. ऑक्‍टोबरपर्यंत म्हसळ्याचे पावसाची नोंद ४९८७ मि.मि. आणि खामगावच्या पावसाची नोंद ४०८३ मि.मि. आहे. सरकारी नोंदीप्रमाणे सुमारे ९०४ मि.मि. पाऊस म्हसळ्याला जास्त पडला. 

पर्जन्यमापक केंद्रामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज घेता येतो. म्हसळ्याच्या पावसाचा अंदाज केला असता म्हसळा तालुक्‍यात ५५०० ते ५८०० मि.मि. पाऊस झाला असावा. म्हसळ्याप्रमाणेच तळा, माणगाव तालुक्‍याचे पर्जन्यमानाचा अभ्यास होणे आवश्‍यक आहे.
- दुर्वास म्हशीलकर, शेतकरी, म्हसळा

पर्जन्य यंत्राबाबत तत्काळ माहिती व तांत्रिक मदत घेऊन योग्य जागी ती नव्याने बसवण्यात येतील.
- शरद गोसावी, तहसीलदार, म्हसळा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mhasala Rainfall measurement center in fault