झोपडपट्टी भागात सुरक्षेसाठी ‘एमआयडीसी’चे सुचनाफलक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

औद्योगिक वसाहतीमधील डोंगर-उतारावर वसलेल्या झोपडपट्टी परिसरात एमआयडीसीकडून अपघाताची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. या फलकाद्वारे धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करू नये, असे आवाहन एमआयडीसीच्या वतीने करण्यात आले आहे.

नवी मुंबई ः औद्योगिक वसाहतीमधील डोंगर-उतारावर वसलेल्या झोपडपट्टी परिसरात एमआयडीसीकडून अपघाताची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. या फलकाद्वारे धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करू नये, असे आवाहन एमआयडीसीच्या वतीने करण्यात आले आहे.

डोंगरकिनारी राहणाऱ्या मुंब्रा येथील घरावर दरड कोसळण्याची घटना घडली. नवी मुंबईतही मुसळधार पावसामुळे शनिवारी (ता. ७) गणपतीपाडा परिसरातील एका घरावर दरड कोसळली. याशिवाय वाशीमधील वापरात नसलेली धोकादायक इमारतही कोसळली. यामुळे शहरातील इतर धोकादायक इमारती व औद्योगिक वसाहतीमध्ये डोंगर-उतारावर वसलेल्या झोपड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसीसह महापालिका प्रशासनाने सर्व धोकादायक वसाहतींच्या परिसरामध्ये अपघात होण्याची शक्‍यता असल्याने येथील घरांचा वापर तत्काळ थांबविण्यात यावा, अशी नोटीस संबंधितांना बजावली आहे. 

तुर्भे येथील गणपतीपाडा परिसरातील नऊ घरांना टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना इतरत्र सोय करावी लागत आहे. एमआयडीसी प्रशासनाने सुरक्षेसाठी डोंगर भागामध्ये दरड कोसळणाऱ्या ठिकाणी जीवितहानी होऊ नये, यासाठी हे फलक लावले आहेत. तुर्भे एमआयडीसी, अडवली भुतवली या भागामध्ये फलक लावल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, घरे रिकामी करण्यास भाग पाडले जाण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

डोंगरभागाच्या पायथ्याच्या ठिकाणी दरड कोसळून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून दखल घेण्यात आली असून, सुरक्षेच्या कारणास्तव हा फलक लावण्यात आला आहे.
- एस. एम. कलकुटकी, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'MIDC' information leaflet for slum areas safety