Mumbai : हेदुटणे येथे एमआयडीसीची पाईपलाईन फुटली; ऐन उन्हाळ्यात लाखो लीटर पाण्याची नासाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

midc water pipeline brust near hedutane mumbai water supply Barvi Dam

Mumbai : हेदुटणे येथे एमआयडीसीची पाईपलाईन फुटली; ऐन उन्हाळ्यात लाखो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली - बारवी धरणातून ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची पाईपलाईन मंगळवारी पहाटे हेदुटणे गावाजवळ फुटली. पाण्याच्या दाबामुळे गंजलेल्या पाईपलाईनला तडा जाऊन पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले.

एमआयडीसी प्रशासनाने पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेतले असून मंगळवारी रात्री पर्यंत हे काम पूर्ण होऊन त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

पाईपलाईनच्या बाजूला काही बांधकाम करण्यात आले होते, त्या ठिकाणचा लाईनचा भाग हा गंजला असल्याचे यावेळी दिसून आले. पाईप गंजल्याने त्याला चिर गेल्याविषयी एमआयडीसीला विचारणा केली असता त्यावर मात्र अधिकाऱ्यांनी बोलणे टाळले.

एमआयडीसीच्या बारवी धरणातून 1722 मिमी व्यासाची महापेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन मंगळवारी पहाटे फुटली. या पाईपलाईनवरुन कळवा, मुंब्रा, दिवा, नवी मुंबई, मिरा भाईंदर, महापे औद्योगिक विभाग यांस पाणी पुरवठा केला जातो.

पहाटे 5.30 च्या दरम्यान एमआयडीसी अधिकाऱ्यांना हेदुटणे गावाजवळ पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी जमिनीला लागून असलेल्या पाईपलाईनला चिर गेल्याची बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आली.

त्यातून हजारो लीटर पाणी वाहून जात ते आजूबाजूच्या परिसरात पसरले होते. महापे पाईपलाईन मधील पाणी पुरवठा बंद करण्यात आला. पाईपलाईन मधील पाण्याचा दाब कमी होण्यास काही तासांचा अवघी गेला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने वाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. चिर गेलेल्या ठिकाणी 2 मी व्यासाची पट्टी बसविण्यात येणार असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

एमआयडीसीच्या पाईपलाईनला लागूनच गाळ्याचे बांधकाम करण्यात आले होते. हे बांधकाम यावेळी एमआयडीसी प्रशासनाने पाडले. या बांधकामामुळे पाईपलाईनचा ठराविक भाग मोठ्या प्रमाणात गंजल्याचे दिसून आले. पाईप गंजल्यामुळे त्याला चिर गेल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत होते. याविषयी अधिकाऱ्यांना विचारले परंतू त्यावर त्यांनी बोलणे टाळले.

या पाईपलाईनमघून दररोज सुमारे 900 ते 1100 दलली पाणी पुरवठा दिवा, मुंब्रा, नवी मुंबई, मिरा भाईंदर, महापे एमआयडीसी परिसरात होतो. पाईपलाईन फुटल्याने त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर झाला आहे. मंगळवारी दिवसभर पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरु राहणार असून काम पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत सुरु केला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेदुटणे जवळ महापेला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची पाईपलाईन पहाटे फुटली. या वाहिनीचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. सायंकाळ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर हळूहळू पाणी पुरवठा पूर्ववत केला जाईल. एमआयडीसीने बारवी गुरुत्व वाहिनी 1 आणि 2 बदलण्याचे काम हाती घेतले आहे. वर्ष दिड वर्षाच्या कालावधीत ही पूर्ण वाहिनी बदलण्यात येणार आहे. त्यानंतर ही समस्या उद्भवणार नाही.

- व्ही. पी. शेलार, उप अभियंता, एमआयडीसी