दीड हजार ग्रामस्‍थांचे स्थलांतर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मुंबई  : रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या दीड हजार ग्रामस्‍थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी दिली. पेण तालुक्‍यातील अंतोरे आणि कणे या पूरग्रस्त गावांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्यातील नदी किनाऱ्यावरील ४५ गावे व खाडी किनारी असलेल्‍या ८२ गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

या वेळी आमदार धैर्यशील पाटील, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पेण तहसीलदार अरुणा जाधव, सभापती स्मिता पेणकर, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे आदी उपस्थित होते. गेल्‍या चार दिवसांपासून कोसळलेल्‍या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्‍यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. अंतोरे व कणे या गावांत पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना लष्कर व एनडीआरएफ पथकाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

कणे गावातील खारबंदिस्ती फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गावात शिरले. ही खारबंदिस्तीची तात्पुरती दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे जिल्‍हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. लष्कर, कोस्टगार्ड, एनडीआरएफच्या जवानांना पुरग्रस्‍त भागातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात यश आले. येथे २० बोटी तैनात केल्या आहेत. नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून भरपाई दिली जाईल. शेतीमधील पाणी ओसरल्यावर शेतीचेही पंचनामे करण्यात येतील, असेही त्‍यांनी सांगितले. दरडग्रस्त महाड, पोलादपूरमधील अनेक नागरिकांनाही स्थलांतरित केल्याचे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migration of one and a half thousand villagers