कल्याण-डोंबिवलीत पेशंटसचे बोटीतून स्थलांतर

सुचिता करमरकर
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

- बैल बाजार परिसरात असलेल्या फोर्टीस हॉस्पिटल भागात पाणी साठाल्याने सुरक्षिततेसाठी विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला होता.

- पण पाणी उतरायचे चिन्ह दिसत नव्हते आणि जनरेटरचे इंधनही संपायच्या मार्गावर होते.

- अशा वेळी  हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटला अन्यत्र हलवणे आले होते.

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरात शनिवार-रविवारीपावसाने थैमान घातले होते. रविवार सकाळपासून कल्याणमधून बाहेर पडणारे सर्व रस्ते पुराच्या पाण्याने अडवले होते. बैल बाजार परिसरही याला अपवाद नव्हता. याच ठिकाणी असलेल्या फोर्टीस हॉस्पिटल भागात पाणी साठायला सुरुवात झाली होती. सुरक्षिततेसाठी विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला होता.

दिवसभर जनरेटरवर हॉस्पिटलचे काम सुरु होते. मात्र संध्याकाळनंतर पाणी उतरायचे चिन्ह दिसेना आणि जनरेटरचे इंधनही संपायच्या मार्गावर होते. अशावेळी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटला अन्यत्र हलवणे अत्यंत आवश्यक होते.पोलिसांना या सर्व  प्रकाराची कल्पना देण्यात आली. पो

लिसांनी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यासाठी कॉल दिला. मात्र ते पथक येईपर्यंत न थांबता अतिरिक्त आयुक्त दत्ता कराळे, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत चव्हाण आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला. जावेद पठाण यांच्या खाजगी बोटीचाही या मोहिमेत वापर करण्यात आला. सात रुग्ण यावेळी फोर्टिसमधून बाहेर हलवण्यात आले. रात्री नऊच्या सुमारास ही थरारक रुग्ण सुटका सुरू करण्यात आली. दीड तासात या रुग्णांना दोन बोटींच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी नेण्यात आले. 

या सातही रुग्णांना व्हेंटिलेटरसह बोटीतून पत्री पुलापर्यंत नेण्यात आले. बोटीत रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी डॉक्टरही होते. पत्री पुलाजवळ तीन रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या होत्या. तेथून यातील पाच रुग्णांना मुलुंड फोर्टीसला तर दोन जणांना कल्याण-डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले. कल्याण-डोंबिवली पालिकेच्या अग्निशमन दलातील नामदेव चौधरी, विनायक लोखंडे, तसेच जीवन बोराडे यांच्या पथकाने या सुटकेत मोलाची भूमिका बजावली. त्याचप्रमाणे जेपी रिसॉर्टच्या जावेद पठाण यांनी आपली बोट उपलब्ध करून दिली तसेच या सुटकेसाठी ते स्वतः जातीने हजर होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migration of patients from Forties Hospital at Kalyan Dombivli