मुख्यमंत्र्यांचा 'तो' निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर थेट बाळासाहेब थोरातांच्या निवासस्थानी

uddhav thackeray and thorat
uddhav thackeray and thorat

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत राजकारण तापलं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 21 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं जालना जिल्ह्यातल्या राजेश राठोड तर अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर ऊर्फ पापा मोदी अशा दोघांना उमेदवारी दिल्यानं निवडणूक बिनविरोध होणार नाही आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात दोन उमेदवारांवर अडून बसल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला निरोप धाडला आहे. 

जर काँग्रेस आडमुठेपणा सोडणार नसेल तर मी विधान परिषद निवडणुक लढवणार नाही, असा निरोप उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब थोरातांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध लढवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहेत. मात्र आता काँग्रेसने दोन उमेदवार जाहीर केल्यानं निवडणूक अटळ आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीत धूसफूस असल्याचं समोर आलं. 

काँग्रेस नेते बैठक घेऊन चर्चा करणार 

निवडणुकीसाठी काँग्रेसने एका जागेवर उमेदवार द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. मात्र काँग्रेसकडून परस्पर दोन उमेदवार उभे करण्यात आलेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या निरोपानंतर काँग्रेस नेते आपली भूमिका मुख्यमंत्र्यांना कळवणार असून काँग्रेसचे नेतेही बैठक घेऊन यावर चर्चा करणार आहेत. 

मिलिंद नार्वेकरांनी घेतली थोरातांची भेट 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांनी शनिवारी रात्री  बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांचा खास निरोप  थोरातांना देण्यासाठी त्यांची भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे.थोरात यांच्या रॉयल स्टोन या निवासस्थानी रात्री उशिरा नार्वेकर भेट घेऊन मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला.

काँग्रेसच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष 

काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी पहिल्यांदा राजेश राठोड यांना उमेदवारी जाहीर केली गेली. त्यानंतर थोरातांनी राजकिशोर उर्फ पापा मोदी यांचं नाव जाहीर केलं. काँग्रेसनं दुसरा उमेदार देऊ नये. महाविकास आघडीचे सहा उमेदवार ऐवजी पाच उमेदवार द्यावेत जेणेकरून विधान परिषद निवडणूक बिनविरोध होईल, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. पण काँग्रेसने आग्रही भूमिका घेत पुढचं पाऊल टाकलं.काँग्रेसच्या या पवित्र्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

या जागांसाठी असणार निवडणूक 

विधानपरिषदेचे 8 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झालेत. त्यापैकी एक जागा 24 एप्रिलच्या आधीपासून रिक्त आहे. यात राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झालेत. तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होईल. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 5 तर भाजपचे 4 उमेदवार निवडून येतील असा दावा केला जात होता. पण आता काँग्रेसने सहाव्या जागेवरही दावा केला आहे. त्यानुसार आता शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसही 2 जागा लढतील.

दुसरीकडे भाजपनं संख्याबळानुसार 4 जागांवर दावा केला आहे. मात्र आता महाविकास आघाडीकडून सहावा उमेदवार जाहीर झाल्यानं भाजपही आणखी एक उमेदवारी देण्याची शक्यता आहे. भाजपकडून विधानपरिषदेसाठी यावेळी नवीन नेत्यांना संधी दिली आहे. डॉक्टर अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपनं  निवडणुकीसाठी दिग्गज नेत्यांना डावललं आहे. 

21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं घोषणा केली. तसंच केंद्रीय निवडणूक आयोगानं तारीख आणि पूर्ण कार्यक्रमही जाहीर केला. मुंबईत ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मतं हवीत. निवडणुकीच्याच दिवशी मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी 26 मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिलेत. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सेनेनं उद्धव ठाकरेंसह निलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे

भाजप- 105
शिवसेना- 56
राष्ट्रवादी काँग्रेस- 54
काँग्रेस- 44
बहुजन विकास आघाडी- 3
समाजवादी पार्टी- 2
एम आय एम- 2
प्रहार जनशक्ती- 2
मनसे- 1
माकप- 1
शेतकरी कामगार पक्ष- 1
स्वाभिमानी पक्ष- 1 
राष्ट्रीय समाज पक्ष- 1
जनसुराज्य पक्ष- 1
क्रांतिकारी शेतकरी पक्ष- 1
अपक्ष- 13
निवडून येण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असेल  {288/(9+1)= 28.8} म्हणजेच 29 मते. 

निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार आहेत?

उद्धव ठाकरे- शिवसेना
निलम गोऱ्हे- शिवसेना
शशिकांत शिंदे- राष्ट्रवादी काँग्रेस
अमोल मिटकरी- राष्ट्रवादी काँग्रेस
राजेश राठोड- काँग्रेस
राजकिशोर मोदी- काँग्रेस
रणजितसिंह मोहिते पाटील- भाजप
गोपीचंद पडळकर- भाजप
प्रवीण दटके- भाजप
डॉ. अजित गोपछेडे- भाजप

Milind Narvekar took masseage of the Chief Minister and went straight to Balasaheb Thorat's residence

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com