#MilkAgitation दूध कोंडीचा फटका!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जुलै 2018

मुंबईतील आवक ५० टक्क्यांवर; गुजरातचे टँकर परत

मुंबईतील आवक ५० टक्क्यांवर; गुजरातचे टँकर परत
मुंबई - दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या संपामुळे तीन दिवसांनंतर राज्यभरात दूध संकलनाचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांवर आले आहे. त्यामुळे मुंबईत २५ लाख लिटरपेक्षाही कमी दूध पोचले आहे. मुंबईला दुधाची रसद मिळू नये, यासाठी  अहमदाबाद-मुंबई महामार्गावर महाराष्ट्र-गुजरात सीमेजवळ अच्छाड येथे ठाण मांडून असलेल्या ‘स्वाभिमानी’च्या नेते-कार्यकर्त्यांनी बुधवारी गुजरातवरून मुंबईत दूध आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. त्यांच्या आंदोलनामुळे सुमारे २५ टॅंकर परत गुजरातला पाठवावे लागले. दुसरीकडे, मुंबई परिसरातील दूध वितरकांकडील दुधाचा साठाही संपत आला आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना गुरुवारी सकाळी बिनदुधाचा चहा पिऊन तल्लफ भागवावी लागणार आहे. 

या आंदोलनावर बुधवारी रात्रीपर्यंत तोडगा निघाला नव्हता. दुधासाठी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट पाच रुपये अनुदान देण्याबाबत सरकार चर्चाही करत नसल्याने स्वाभिमानीचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी राज्यभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. त्याअंतर्गत कुटुंब आणि जनावरांसह रस्त्यावर उतरण्याचे आवाहनही त्यांनी दूध उत्पादकांना केले आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्‍यता आहे.

मुंबईला गुजरातमधील अहमदाबादमधून रेल्वेने दूध पाठवण्यास परवानगी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे. त्यानुसार सौराष्ट्र एक्‍स्प्रेसला दुधाचे टॅंकर जोडले जाणार होते; आंदोलकांच्या धमकीमुळे ४४ हजार लिटर क्षमतेचे १२ टॅंकर या एक्‍स्प्रेसला जोडले गेले नाहीत. त्यामुळे सरकारचा हा प्रयत्नही अयशस्वी ठरला.

आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या प्रयत्नात आहोत. मध्यस्थी करण्यास कोणाला पाठवले तर चर्चा करणार का, असा मला निरोप आला आहे. चर्चेची आमची तयारी सुरुवातीपासूनच आहे; मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत या भूमिकेवर मी ठाम आहे.
- खासदार राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

नवी मुंबई 
 आंदोलनामुळे नवी मुंबई एमआयडीसीत असलेल्या दूध कंपन्यांचे दुधाचे टॅंकर राज्याच्या ग्रामीण भागांतून येऊ शकले नाहीत.
 गुरुवारी साठवलेल्या दुधावरच या कंपन्यांची मदार.
 सोनई, नेचर, गिब्स यांसारख्या कंपन्यांच्या पॅकिंग दुधाच्या पिशव्या पुण्याहून येतात. त्यांनाही या आंदोलनाचा फटका बसल्याने शहरात गुरुवारी पिशव्यांतील दूधही उपलब्ध न होण्याची शक्‍यता.

पालघर 
 खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभामानीचे कार्यकर्ते जिल्ह्यात तळ ठोकून.
 ‘स्वाभिमानी’ने अच्छाड येथे गुजरातचे टॅंकर रोखले.
 बोईसरमधील अमूल डेअरीसमोरही संघटनेकडून आंदोलन.
 डहाणू स्थानकात ‘स्वाभिमानी’ संघटनेकडून रेल रेको

मुंबईत आज ४३ लाख लिटरचा तुटवडा
     गुरुवारसाठी २७ लाख ४० हजार लिटर उपलब्ध. रोज ७० लाख लिटरची गरज.
     अमुलकडून रोज १३ लाख ५० हजार लिटर; गुरुवारसाठी १५ लाख लिटर.
     मदर डेरीकडून रोज एक लाख ९० हजार लिटर; गुरुवारसाठी अडीच लाख लिटर.
     मुंबईला रोज २० हून अधिक कंपन्यांचा दूधपुरवठा.
     महानंदाकडून रोजच्या दोन लाख लिटरऐवजी एक लाख ८० हजार लिटर. 
    गोकुळच्या सात लाख ५० हजार लिटरऐवजी पाच लाख लिटर.
     वारणाकडून रोजच्या एक लाख ५२ हजारऐवजी एक लाख ५० हजार लिटर.
     गोवर्धनकडून रोजच्या एक लाख ३५ हजारऐवजी एक लाख २० हजार लिटर.
     गोविंदकडून रोजच्या ५० हजारऐवजी ४० हजार लिटर.

Web Title: #MilkAgitation mumbai milk shortage