आता तरी फुटू दे सरकारच्या हृदयाला पाझर! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

आषाढी एकादशीनिमित्त, गिरणी कामगारांचे घरांसाठी विठ्ठल दरबारी साकडे... आता तरी सरकारला सुबुद्धी दे... आम्हाला आमची घरे मिळू दे!  

मुंबई : अनेक वर्षांपासून घरांचा प्रश्‍न रखडल्याने त्रासलेल्या गिरणी कामगारांनी अखेर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात आपला माथा टेकवला. या वेळी "देवा, आता तरी सरकारच्या हृदयाला पाझर फुटू दे... सरकारला सुबुद्धी देऊन आमची हक्काची घरे पदरात टाक,' असे साकडे त्यांनी विठ्ठलाला घातले. 

गिरणी कामगार कृती संघटनेने घरांच्या मागणीसाठी ना. म. जोशी मार्गावरील महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावरून शुक्रवारी (ता. 12) कामगारांची दिंडी काढली. दिंडी लोअर परळ पूल, लालबाग, साईबाबा मार्ग, जी. डी. आंबेकर मार्ग, परळ आणि भोईवाडा अशा मार्गाने वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात आली.

दिंडीत संघटनेच्या समन्वयक जयश्री खाडिलकर पांडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे, गिरणी कामगार संघर्ष समितीचे सरचिटणीस प्रवीण घाग आदी नेते सहभागी झाले होते.

गेल्या पाच वर्षांत सरकारने गिरणी कामगारांसाठी एकही घर बांधलेले नाही. उलट बांधलेली घरे देण्यात चालढकल केली. सरकार गिरणी कामगारांची दखल घेत नसल्याने त्यांनी अखेर दिंडीद्वारे विठ्ठलालाच साकडे घालण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती गिरणी कामगार संघटनांच्या वतीने देण्यात आली. 

प्रथमच घरांसाठी दिंडी 
मुंबईतील गिरणी कामगारांनी साधारण 40 ते 50 वर्षांपूर्वी आध्यात्म्याच्या प्रेमापोटी गिरणगावात भजनकला जोपासली. येथील गल्लीबोळांत कामगारांची अनेक भजन मंडळे आहेत. तेथूनच दर वर्षी वडाळ्याच्या प्रतिपंढरपूरला दिंडीद्वारे जाण्याची प्रथा जन्माला आली. आज त्याच गिरणी कामगारांना हक्काच्या घरांसाठी विठोबाला साकडे घालण्यासाठी वेगळी दिंडी काढावी लागली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mill Workers Dindi In Mumbai For House