सामाजिक कार्यातून नागरिकांना लाखोंचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

विक्रोळी - सामाजिक संस्था स्थापन करून नागरिकांना गंडा घालणाऱ्या पती-पत्नीविरोधात विक्रोळी पोलिस व घाटकोपरच्या पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे. 

विक्रोळी - सामाजिक संस्था स्थापन करून नागरिकांना गंडा घालणाऱ्या पती-पत्नीविरोधात विक्रोळी पोलिस व घाटकोपरच्या पंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे. 

विक्रोळीतील हरियाली व्हिलेजमध्ये नीलेश शहा ऊर्फ निलू जैन आणि त्याची पत्नी मनीषा सोरठिया या दाम्पत्यांनी ‘डिवाईन फाऊंडेशन’ आणि ‘ब्लू’ या नावाने संस्था स्थापन केली होती. या संस्थेंतर्गत सामाजिक कार्याच्या नावाखाली दोघांनी अनेकांकडून देणग्या गोळा केल्या. यात गुजराती-जैन समाजातील लोकांचा मोठा सहभाग आहे. गुजराती समाजात असलेल्या ओळखीचा त्याने फायदा उचलला. ‘अर्ध्या किमतीत घरपोच औषध सेवा’ ही योजना त्याने सुरू केली. अनेकांकडून दोन ते तीन वर्षांसाठीचे आगाऊ पैसे घेतले. काही काळ औषधेदेखील पुरवली. गत महिन्यापासून औषधे का येत नाहीत, याचा तपास करण्यासाठी काही जण त्याच्या विक्रोळीतील कार्यालयात गेले. तेव्हा तो गायब असल्याचे त्यांना समजले. कार्यलयातील १२ कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून वेतन दिले नसल्याचे या वेळी उघडकीस आले. त्यांनाही हे दोघे पती-पत्नी कोठे गेले आहेत, याची माहिती नाही. 

घाटकोपर येथील प्रीती उपाध्याय या महिलेकडून १० लाख रुपये नीलेशने घेतले आहेत. भरत चोथानी या औषधविक्री करणाऱ्या व्यावसायिकाला देखील त्याने लाखोंचा गंडा घातला. व्हॉट्‌सॲप आणि फेसबुकवर ग्रुप बनवून देशभरातून त्याने निधीही गोळा केल्याची माहिती फसवणूक झालेल्या नागरिकांनी दिली. जैन समाजातील काही संतांच्या नावाचा उपयोग करून त्यांनी लोकांचा विश्‍वास मिळवला. दुष्काळग्रस्त गावांना मदत म्हणून त्याने मोठ्या प्रमाणात निधी जमा केला. लवकरच जैन फूड प्लाझा, जैन गृहउद्योग, त्याची पत्नी स्वतः डॉक्‍टर आहे असे सांगून होमिओपथी दवाखाना काढणार असल्याचेही त्याने नागरिकांना सांगितले. अशा प्रकारे समाजसेवेच्या नावाखाली नागरिकांना फसवून नीलेशने कोट्यवधींची माया जमा केली असल्याचा संशय आता लोकांना आहे.

फसवण्यासाठी राबवलेल्या योजना
- अर्ध्या किमतीत औषधे पुरवण्याची योजना
- दुष्काळग्रस्तांना मदत
- गरिबांच्या मदतीसाठी रद्दी जमा करण्याचे आवाहन
- फूड प्लाझा, गृहउद्योग, होमिओपॅथी दवाखाना सुरू करण्याचे आश्‍वासन

Web Title: Millions of citizens in social work discipleship