गुंतवणूकदारांना लाखोंचा फटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

पोलिसांकडून गुडविन ज्वेलर्स सील; दुकानमालकावर गुन्हा दाखल

ठाणे : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडवरील गुडविन ज्वेलर्सचे दुकान ऐन दिवाळीत दुकानमालकाने बंद केल्याने विविध योजनांतर्गत सोने खरेदीसाठी गुंतवणूक केलेल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या गुंतवणुकदारांनी शनिवारी (ता. २६) एकत्र येऊन रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सवर कारवाई करत दुकान सील केले. पोलिसांनी दुकानमालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गुडविन ज्वेलर्सचे दुकान दोन दिवसांसाठी बंद राहील, असा संदेश असलेला कागद चार-पाच दिवसांपूर्वी दुकानाबाहेर लावण्यात आला होता. ऐन दिवाळीत दुकान बंद झाल्याने गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले होते. समाजमाध्यमांवरही ज्वेलर्सचा मालक फरारी, असे संदेश पसरल्याने गुंतवणूकदारांची धाकधुक जास्त वाढली होती. दिवाळी तोंडावर आल्याने तसेच लग्नसराईचेही दिवस सुरू होणार असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी येथे कष्टाची कमाई गुंतवली होती.

दोन दिवस वाट पाहूनही दुकान खुले न झाल्याने गुंतवणूकदारांनी दुकानाबाहेर शनिवारी बैठक घेतली. या वेळी गुंतवणूकदारांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सच्या दुकानाला सील केले. मानपाडा रोडवर एकच गर्दी झाल्याने शनिवारी काही काळ वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसही तैनात होते. या शाखेत अनेकांची २५ लाखापर्यंतची गुंतवणूक झाली आहे.

गुडविन ज्वेलर्स हे दुकान २१ ऑक्‍टोबरपासून बंद आहे. सोमवारी आम्हाला गुंतवलेले पैसे मिळणार होते; परंतु पैसे नाहीत, असे सांगून दोन दिवसांनी दुकान उघडल्यावर पैसे देऊ, असे आम्हाला सांगण्यात आले होते; परंतु तेव्हापासून शिवाजी पुतळा व मानपाडा रोड दोन्ही शाखा बंद आहेत.
- रिचर्ड वाज,
गुंतवणूकार

सध्या गुडविन ज्वेलर्सच्या दुकानातील कर्मचारी व सहकाऱ्यांचे मोबाईल बंद आहेत. त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांनी एकत्र येत ज्वेलर्सविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
- सुनील पाटील,
गुंतवणूकदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions hit to investors in Dombivali