नवी मुंबईतील कोट्यवधींचे प्रकल्प धूळ खात!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

नवी मुंबई महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी विविध सोयी-सुविधा व कोट्यवधी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची निर्मिती केली; मात्र उद्‌घाटनाविना वापर होत नसल्यामुळे अनेक प्रकल्प धूळ खात पडून आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी विविध सोयी-सुविधा व कोट्यवधी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची निर्मिती केली; मात्र उद्‌घाटनाविना वापर होत नसल्यामुळे अनेक प्रकल्प धूळ खात पडून आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांची उभारणी कशासाठी, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनेक तयार प्रकल्पांचे उद्‌घाटन रखडले होते; मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतरही हे प्रकल्प उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांकडून याबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई महापालिकेमार्फत तयार करण्यात आलेले अनेक प्रकल्प विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उद्‌घाटनाविना पडून आहेत. घणसोलीतील सेंट्रल पार्कमागील एक वर्षापासून बांधून पूर्ण असतानादेखील वापर नसल्याने त्या ठिकाणी देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट आणण्याची वेळ पालिकेवर आली आहे. पंचमहातत्त्वावर आधारित या सेंट्रल पार्कसाठी पालिकेने जवळजवळ १५ कोटींपेक्षा अधिकचा खर्च केला. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, नुकताच त्याच्या तिकीटदराबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, परंतु तरीदखील हे महत्त्वपूर्ण पार्क उद्‌घाटनाविना वापरात नाही. तसेच ऐरोली सेक्‍टर १७ येथील अभ्यासिकेची इमारत वापरात नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जागेअभावी तसेच अभ्यासासाठी आवश्‍यक वातावरण नसल्यामुळे नुकसान होत आहे.

सानपाडा येथील अण्णाभाऊ साठे समाजमंदिर पूर्ण होऊन तीन वर्षे झाली, पण तिचाही पूर्णत्वाने वापर नाही. सानपाडा येथेच आकर्षक व देखणे असे सेन्सरी उद्यान बनवण्यात आले आहे. हे उद्यान कधी सुरू होणार, अशी विचारणा येथील नागरिक करत आहेत, परंतु अद्यापही त्यास मुहूर्त मिळालेला नाही. हजारो नागरिकांची सातत्याने वर्दळ असलेला व तुर्भे येथील शहरातील पहिला क्‍लॉक टॉवर उभारण्यात आला आहे. शहरवासीयांसाठी उत्सुकता असलेला हा टॉवर उद्‌घाटनाविना पडून आहे. वाशी अग्निशमन केंद्र, वाशी अग्निशमन विभाग कर्मचारी निवासी संकुलदेखील उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. आधी लोकसभा निवडणूक, त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दिरंगाईचा फटका या प्रकल्पांना बसला असून, काही प्रकल्प हे निव्वळ श्रेयवादाच्या कचाट्यात सापडले आहेत.

हे प्रकल्प उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत
- घणसोली सेंट्रल पार्क
- तुर्भे येथील घड्याळ टॉवर
- सानपाडा येथील सेन्सरी उद्यान
- ऐरोली सेक्‍टर १७ येथील अभ्यासिका
- ऐरोलीतील अण्णाभाऊ साठे समाजमंदिर
- वाशी अग्निशमन केंद्र
- वाशी अग्निशमन विभाग कर्मचारी निवासी संकुल

नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी हे प्रकल्प तयार केले. ते वापराविना पडून ठेवण्यापेक्षा तत्काळ वापरात आणण्याबाबत आपण आग्रही असून, शहराचे महापौर सुतार यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहे.
-अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका.

शहरातील तयार प्रकल्पांचे उद्‌घाटन लवकरात लवकर करण्यात येईल. निवडणुकीनंतर पुन्हा वेगाने कामाला सुरुवात झाली असून, लवकरात लवकर तयार प्रकल्पांची उद्‌घाटने करण्यात येतील.
-जयवंत सुतार, महापौर, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of projects in the navi mumbai are in dust!