फेट्यांच्या व्यवसायात स्वागतयात्रेमुळे लाखोंची उलाढाल? 

शलाका सावंत
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या फेट्यांनी आता मुलींनाही वेड लावले आहे. यंदा पुणेरी, कोल्हापुरी, स्वामिनारायण, मल्हारी पगडीचा "ट्रेंड' असल्याचे चित्र आहे. 

ठाणे - मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरात गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या स्वागतयात्रांमुळे फेट्यांच्या व्यवसायात लाखोंची उलाढाल होण्याची शक्‍यता या व्यवसायातील जाणकारांकडून व्यक्‍त केली जात आहे. पारंपरिक वेशभूषेबरोबरच डोक्‍यावर भगवा फेटा परिधान करून, पाठीवर शेला मिरवत तरुणाई मोठ्या संख्येने या शोभायात्रांमध्ये सहभागी होते. एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या फेट्यांनी आता मुलींनाही वेड लावले आहे. यंदा पुणेरी, कोल्हापुरी, स्वामिनारायण, मल्हारी पगडीचा "ट्रेंड' असल्याचे चित्र आहे. 

यंदा मुंबई-ठाणे परिसरात तब्बल 40 हून अधिक लहान-मोठ्या शोभायात्रा निघणार आहेत. घरगुती सण-समारंभ आणि स्वागतयात्रेपासून ते दुचाकी फेरीपर्यंत सगळीकडे आवर्जून "स्टायलिश' फेटे घालण्याची क्रेझ मुलींमध्ये वाढत आहे. ठाण्यातील फेट्यांचे व्यावसायिक शिवाजी साळुंखे यांच्या मते दरवर्षी फेटा खरेदी करणाऱ्या मुलींची संख्या वाढत आहे. पारंपरिक फेट्याला खास आधुनिक साज देऊन आपल्याला हवे तसे फेटे बनवण्याकडे त्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येते. गुढीपाडव्याला डोक्‍यावर फेटा बांधण्यासाठी साधारण 100 ते 120 रुपये आकारले जातात. त्यात कापडही फेटे बांधणारा आणतो, तर भाड्याचे फेटे साधारण 150 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पगडी स्टाईल किंवा जडाव असलेले फेटे हे 1500 ते 2000 दरम्यान उपलब्ध आहेत. स्वतःची साडी किंवा कापड असल्यास फेटे बांधण्यासाठी साधारण 25 ते 50 रुपये आकारले जातात. मोठ्या शोभायात्रांमध्ये साधारण दोन ते अडीच हजार लोक सहभागी होतात. छोट्या शोभायात्रांमध्ये हा आकडा 400 ते 450 लोकांपर्यंत असतो. यातले जवळपास 80 टक्के लोक हे विविध प्रकारचे फेटे परिधान करून मिरवणुकीत सहभागी होतात. त्यामुळेच या शोभायात्रेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांमध्ये फेट्यांच्या व्यवसायात लाखोंची उलाढाल होत आहे. गुढीपाडव्यानिमित्त पुणे, नाशिक, कोल्हापूर यांसारख्या भागातील वेगात फेटे बांधण्यामध्ये निपूण असलेल्या कारागिरांची मागणी वाढत आहे. या कारागिरांची दिवसाची कमाई 10 हजार ते 12 हजारांवर पोहोचते, अशी माहिती साळुंखे यांनी दिली. 

"स्टायलिश' फेट्यांना वाढती पसंती 
मुलींमध्ये फेट्यांची वाढती लोकप्रियता पाहता विविध प्रकारच्या फेट्यांना आर्कषक सजावट करून देण्याकडे व्यापाऱ्यांचा कल आहे. या फेट्यांमध्येसुद्धा यंदा काही नवीन, आकर्षक ट्रेंडस्‌ आले आहेत. पारंपरिक भगव्या फेट्याला आधुनिकतेचा साज लेवून आपल्या इंडो-वेस्टर्न ड्रेसवर मिरवण्याकडे तरुणींचा कल अधिक आहे. नऊवारी साडीवर किंवा पैठणीवर फेटा हा "चार चांद' लावून जातो. ढोल किंवा ध्वजपथकांमध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी तर फेटा प्राधान्याने परिधान केला जातो. छोटासा तुरा आणि छोटा सोगा असलेला पुणेरी फेटा, भरगच्च तुऱ्यामुळे आणि बांधणीसारख्या रंगसंगतीचा कोल्हापुरी फेटा, मल्हारी फेटा, अबोली रंगातील भरगच्च स्वामीनारायण फेटा असे विविध प्रकारचे तयार फेटे तसेच बांधून देणारे कारागिर गुढीपाडव्यानिमित्त उपलब्ध असतात. 

Web Title: Millions of turnover in the business of pheta