उमेदवार प्रचारासाठी बाहेर पडला अन् काँग्रेसवासी झाला!

मुंबई : काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अस्लम शेख यांच्या प्रचारसभेत व्यासपीठावर बसलेले एमआयएमचे उमेदवार इस्माईल शेख (वर्तुळात).
मुंबई : काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अस्लम शेख यांच्या प्रचारसभेत व्यासपीठावर बसलेले एमआयएमचे उमेदवार इस्माईल शेख (वर्तुळात).

मुंबई : गेल्या काही दिवसांत पक्षांतराला एवढे ऊत आले होते, की कोण कधी उठून कोणत्या पक्षात जाईल, हे सांगता येत नव्हते. `कार्यकर्त्यांनो, सकाळी प्रचाराला बाहेर पडताना खात्री करा; आपला नेता दुसऱ्या पक्षात तर गेला नाही ना?` हा अशाच प्रकारचा समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला संदेश; मात्र मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक असताना या गमतीदार संदेशाची प्रचिती यावी? एमआयएमचा उमेदवार प्रचाराला म्हणून सकाळी घराबाहेर पडला आणि थेट काँग्रेसवासी झाला. मालाड मतदारसंघात आज घडलेला हा अजब प्रकार.  मग, चर्चा तर होणारच!

मतदानाचा दिवस जवळ आल्याने सर्व उमेदवार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचार करून मतदारांशी संपर्क साधत आहेत. मालाडमधील एमआयएमचे उमेदवार इस्माईल शेख प्रचारासाठी सकाळी घराबाहेर पडले. सायंकाळी ते कॉंग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांनी मालवणीत आयोजित केलेल्या सभेत पोहोचले. तिथेच त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून अस्लम शेख यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे एमआयमचे कार्यकर्ते चक्रावून गेले; मात्र "कॉंग्रेस झिंदाबाद' बोलण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. 

इस्माईल यांनी जोरदार प्रचार करून अस्लम यांच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळे महायुतीचे उमेदवार रमेशसिंग ठाकूर यांचे पारडे जड झाल्याचे मानले जात होते; परंतु इस्माईल यांनी आता अस्लम यांना पाठिंबा दिल्याने एमआयएमला झटका बसला असून, कॉंग्रेसच्या हाताला बळ मिळाले आहे. त्यामुळे आता खरी लढत कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच होईल, असे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com