मुंबईत 'एमआयएम'वर कॉंग्रेसचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

मुंबई महापालिका निवडणुकीत पंचरंगी लढती असल्या तरी स्पर्धेत शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. शिवसेनेची मदार मराठी मतांवर आहे. भाजप उत्तर भारतीय, गुजराती मतदारांना चुचकारू पाहत आहे.

मुंबई - कॉंग्रेसच्या परंपरागत मुस्लिम "व्होट बॅंकेला' कात्री लावू पाहणाऱ्या हैदराबाद येथील खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस ए एत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) या पक्षावर कॉंग्रेस पक्षाने मुंबईत लक्ष ठेवले आहे. त्यामुळे "एमआयएम' ही भाजपची "बी' टीम आहे, असे कॉंग्रेसकडून भाजपला हिणवले जाते.

मुंबई महापालिका निवडणुकीत पंचरंगी लढती असल्या तरी स्पर्धेत शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. शिवसेनेची मदार मराठी मतांवर आहे. भाजप उत्तर भारतीय, गुजराती मतदारांना चुचकारू पाहत आहे. बिहारी आणि उत्तर भारतीय मतदारांवर कॉंग्रेस पक्ष अवलंबून राहिला आहे. मुस्लिम मते ही कॉंग्रेस पक्षाची हक्‍काची आणि परंपरांगत अशी ताकद मानली जात आहे. मुस्लिम मतांच्या जोरावर कॉंग्रेस पक्षाने अनेक विजय मिळाल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे.

मात्र अलीकडील काळात मुस्लिमबहुल भागांत "एमआयएम'ने जोरदार मुसंडी मारली आहे. मुस्लिम मते संपादन केली आहेत. त्याचा राजकीय लाभ भाजपला; तसेच शिवसेना यासारख्या पक्षांना झाला आहे. कॉंग्रेसची हक्‍काची मते "एमएमआय'ने घेतल्याने कॉंग्रेसचा पराभवाची चव चाखावी लागल्याचे; तर हिंदुत्वावादी पक्षाचा विजय झाल्याचे दिसून आले आहे. "एमआयएम' हा पक्ष जितकी जास्त मुस्लिम मते घेईल, तितके जास्त नुकसान कॉंग्रेस पक्षाचे होणार असल्याने या पक्षावर मुंबईत कॉंग्रेसचे बारीक लक्ष असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: MIM fight against congress in mumbai