राखीवर पावभाजी, डोसा अन्‌ वडापाव!

उत्कर्षा पाटील
रविवार, 21 जुलै 2019

यंदा पर्यावरणपूरक मिनिएचर फूडीज राखीची बहिणींमध्ये क्रेझ आहे. म्हणूनच वडा-पाव, बर्गर, पावभाजी, ढोकळा, मसाला डोसा अशा पदार्थांच्या प्रतिकृती राखीवर दिसत आहेत...

मुंबई : वडा-पाव, बर्गर, पावभाजी, ढोकळा, मसाला डोसा, जिलेबी-फाफडा, छोले भटुरे... पदार्थांची नावे ऐकूनच तोंडाला पाणी सुटले ना? सध्याची वाढती खाद्यसंस्कृती अन्‌ खाद्यप्रेम यंदा राख्यांमध्येही पाहायला मिळणार आहे. खास खाद्यप्रेमींसाठी बनवण्यात आलेल्या ‘फुडीज मिनिएचर राखी’वर असे पदार्थ अवतरले आहेत.

मेघना माणिक आणि सुधा चंद्रनारायण यांनी खास खाद्यप्रेमींसाठी यंदा ‘फुडीज मिनिएचर राखी’ बनवल्या आहेत. त्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत आहे. विशेष म्हणजे राख्या ‘एअर ड्राय क्‍ले’पासून बनवल्या असल्याने त्या पर्यावरणपूरक आहेत.

मिनिएचर राखीबद्दल बोलताना मेघना माणिक म्हणाल्या, ‘सध्या मिनिएचर वस्तूंची प्रचंड क्रेझ आहे. अशी राखी रक्षाबंधनानंतर शो-पीस म्हणूनही वापरता येते. दर वर्षी ग्राहकांना काहीतरी नवीन हवे असते. त्यामुळे विविध खाद्यपदार्थांचे मिनिएचर बनवून त्याची राखी बनवण्याची संकल्पना सुचली. बहिणींनाही ती खूप आवडली. आतापर्यंत आम्हाला १०० राख्यांची ऑर्डर मिळाली आहे.’

‘एअर ड्राय क्‍लेपासून मिनिएचर राखी तयार केली जाते. एक राखी बनवण्यासाठी २ ते ३ तास लागतात. एक दिवस सुकल्यानंतर त्यावर रंगकाम केले जाते. सर्व राख्या आम्ही स्वतः बनवतो,’ असे मिनिएचर क्‍ले आर्टिस्ट सुधा चंद्रनारायण यांनी सांगितले. मिनिएचर राखी २२० रुपयांना उपलब्ध आहे. व्हॉट्‌सॲप व फेसबुकद्वारे आम्ही राख्यांची नोंदणी स्वीकारत असून आतापर्यंत १०० राख्यांची ऑर्डर मिळाली असल्याचे सुधा म्हणाल्या.

राखीची वैशिष्ट्ये

  • ग्राहकांच्या आवडीनुसार राखी बनवून मिळते
  • विविध २५ ते ३० खाद्यपदार्थांच्या राख्या उपलब्ध 
  • व्हॉट्‌सॲपवरून नोंदणीची सुविधा
  • रक्षाबंधनानंतर शो-पीस म्हणूनही वापर
  • एअर ड्राय क्‍ले’पासून बनवल्या असल्याने पर्यावरणपूरक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miniature Foodies Rakhi On Demand in Mumbai