बेस्टचे किमान भाडे होणार पाच रुपये?

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 जून 2019

'बेस्ट' बसचे किमान भाडे पाच रुपये करण्याबाबच्या प्रस्तावास "बेस्ट' समितीने मंजूरी. 

मुुंबई : 'बेस्ट' बसचे किमान भाडे पाच रुपये करण्याबाबच्या प्रस्तावास "बेस्ट' समितीने मंगळवारी मंजुरी दिली. मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर तसेच रस्ते वाहतूक प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल. त्यानंतर मुंबईकरांना "बेस्ट'च्या साध्या बसमधून किमान 5 रुपयांत तर कमाल 20 रुपयांत प्रवास करता येईल. 

"बेस्ट'ला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी 600 कोटींचे आर्थिक साह्य करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे; मात्र, त्यापूर्वी सध्याच्या भाड्यात कपात करण्याची तसेच भाडेतत्त्वावर बस घेण्याच्या अटीही पालिकेने घातल्या होत्या. या अटींचे पालन करण्यास "बेस्ट' समितीने मंगळवारी मंजुरी दिली. 

भाडेकपातीचा प्रस्ताव 21 जूनला "बेस्ट' समितीच्या सभेत मंजुरीसाठी आला होता; मात्र सदस्यांच्या प्रश्‍नांना "बेस्ट' प्रशासनाने योग्य उत्तर न दिल्याने या मुद्‌द्‌यावर निर्णय घेण्यासाठी 25 जूनला विशेष बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

"बेस्ट' समितीने दिलेल्या मंजुरीमुळे भाडेतत्त्वावर 530 बस खरेदी करण्याचा उपक्रमाचा मार्गही मोकळा झाला आहे. "बेस्ट'च्या ताफ्यात सध्या 3203 बस आहेत. 530 बस तातडीने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. त्याशिवाय आणखी हजार गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदाही मागवण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात बसचा ताफा 6000 पर्यंत नेण्यात येणार आहे. त्यात मिनी, मिडी, वातानुकूलित आणि इलेक्‍ट्रिक आदी प्रकारच्या बसचा समावेश असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minimum Fare of BEST may be Five Rupees