Mumbai : मंत्री, बाबूंना लागले दुबईचे वेध ; मुख्यमंत्री कार्यालयावर अर्जांचा पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dubai-fnl
मंत्री, बाबूंना लागले दुबईचे वेध ; मुख्यमंत्री कार्यालयावर अर्जांचा पाऊस

मंत्री, बाबूंना लागले दुबईचे वेध ; मुख्यमंत्री कार्यालयावर अर्जांचा पाऊस

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य जनतेला महागाई आणि इंधन दरवाढीच्या झळा सहन कराव्या लागत असताना राज्यातील किमान अर्धा डझन मंत्री आणि तब्बल ५४ अधिकारी हे दुबईवारीवर जाण्याच्या तयारीत आहेत. दुबईत होणाऱ्या एक्स्पोत जाण्याची आम्हाला परवानगी द्या, अशी विनंती करणारे अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आले आहेत.

काही मंत्री परदेशात रवाना झाले आहेत तर त्यांच्या त्यांच्या खात्यातील ५४ अधिकाऱ्यांनी त्यासाठी विनवणी केली आहे. दौऱ्याच्या एक दिवस आधी या मंत्र्यांच्या विनंती अर्जावर योग्य निर्णय घेऊन तो तोंडी कळविण्यात येईल असे मुख्यमंत्री कार्यालयाने कळविले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र यावर विशेष नाराज असल्याचे कळते. आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही संख्या आटोक्यात आणावी यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते. सरकारी खर्चानेच हे सगळे वऱ्हाड दुबईला जाणार आहे.

यांनाही जायचेय दुबईला

उद्योग, पर्यटन, कृषीविकास एवढेच नव्हे तर सांस्कृतिक कार्य, महिला व बालविकास खात्यातील मंत्री आणि अधिकाऱ्यांना दुबईला जायचे आहे. या खात्यांचे सचिव अन् त्यांचे सहाय्यक सचिव अशी ५४ खाशा स्वाऱ्यांची जंगी यादी मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रलंबित आहे. दौऱ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करावा यासाठी या मंत्री व अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव आणि थेट केंद्र सरकारला गळ घातली आहे.

हेही वाचा: एसटीचं होणार खासगीकरण?; महामंडळानं नेमली अभ्यास समिती

या मंत्र्यांचा समावेश

दुबईला निघालेल्या मंत्र्यांची यादीही मोठी आहे यामध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री विश्वजित कदम तसेच फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे आदींचा समावेश आहे. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांच्यासह महिला विकास मंडळाच्या ज्योती ठाकरे यांनाही नेण्याचा घाट घातला आहे.

यड्रावकरांनी मागितली दोनदा परवानगी

१७ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान ही परवानगी मागण्यात आली आहे. यड्रावकर यांनी तर दोन खात्यांचा कार्यभार असल्याने दोनदा जाण्याची परवानगी मागितली आहे. यड्रावकर पहिल्या टप्प्यात १७ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान कृषी खात्याशी संबंधित पाहणीसाठी दुबईला जाऊ इच्छितात तर वस्त्रोद्योग खात्याच्या कामासाठी त्यांना पुन्हा २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांच्यासमवेत दुबईला जायचे आहे.

सुभाष देसाई दोन हात दूर

उद्योगखात्याचे शिष्टमंडळ परवानगी मागत आहे पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या उपचार घेत असल्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मात्र स्वत:ला या दौऱ्यापासून दूर ठेवल्याचे समजते. कृषीमंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी मात्र परदेशी जाण्याची परवानगी मागितल्याने चर्चांना उधाण आले आहे.

अमित देशमुखांकडून स्पष्टीकरण

या संबंधात मंत्र्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, दादाजी भुसे यांच्याकडून उत्तर मिळाले नाही. मात्र अमित देशमुखांनी यावर भाष्य केले. या दुबई एक्स्पोत ७० देश सहभागी होत आहेत. भारतातल्या राज्यांनी तेथे जावे असा सल्ला देत केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला दिवस वाटून दिले होते. मुंबईच्या चित्रनगरीत परदेशी गुंतवणूक आकर्षित व्हावी, त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने तिथे जाण्याचे ठरविले आहे असे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. आम्ही कोणताही लवाजमा सोबत नेलेला नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

loading image
go to top