सोशलच्या ट्रोलर आणि वाह्यात मिडीयाला जितेंद्र आव्हाडांची तंबी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 एप्रिल 2020

कुचाळक्या थांबवा, चाचण्या वाढवा...

ठाणे : माझ्या सतत संपर्कात असणारी एक व्यक्ती कोरोनाबाधित आहे हे कळल्यानंतर मी स्वतः डॉक्टरी सल्ल्यानुसार क्वारंटीनमधे गेलो. माझी चाचणी निगेटिव्ह आली असली तरी सात दिवसांनी होणाऱ्या दुसऱ्या चाचणीपर्यंत आणि त्यानंतर डॉक्टरांनी अनुमती देईपर्यंत मी घराबाहेर पडणार नाही. पण ज्यांनी आपल्या वॉचमनलाही जेवण दिले नसेल किंवा ह्या अडचणीच्या काळात आपल्या मोलकरणीलाही धान्य दिले नसेल त्यांनी उगाच नको त्या सूचना करुन वेळ वाया घालवू नये, अशी तंबी गहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

आव्हाड यांच्या कर्मचाऱ्यांपैकी काही कोरोना बाधित झाल्याने आव्हाड यांनी स्वतः ला होम क्लारांटाईन केले आहे. पण या काळातही त्यांच्यावर टिका टिप्पणी करण्यात मग्न असलेल्या लोकांना ही तंबी दिल्याचे मानले जात आहे. त्याच वेळी त्यांनी किमान एका गरजू व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

मोठी बातमी - परप्रांतीय मजुरांच्या भावनांशी खेळू नका, कोणीही असलात तरीही सोडणार नाही

मी आणि माझ्या पत्नीने एक निर्णय घेतला आणि आमच्या संपर्कातील किंवा ओळखीपाळखीच्या सगळ्यांचीच आपण स्वखर्चाने चाचणी करुया. त्यापैकी 80 लोकांची चाचणी खाजगी ठिकाणी स्वखर्चाने करून घेतली. 80 जणांपैकी 8 जणामधे लक्षणे आढळली. अजून 40 कर्मचा-यांच्या चाचण्याच आम्ही स्वखर्चाने करून दिल्या. त्यामधील 3 जण हे पाझिटिव्ह आले. त्यांचा आमच्याशी कधी संपर्क देखील आला नाही. पण, हे करण्याचे कारण एकच होते की, आमच्या मानवी संवेदना जाग्या आहेत. ह्या देशामध्ये सार्वत्रिक चाचण्या होत नसल्यामुळे कदाचित संख्या आपल्याला कळत नाही. पण, आपल्या खिशात असलेला दोन पैशाचा वापर दुस-यासाठी करावा ही मानसिकता नसलेली लोक या सगळ्याच गोष्टींची टिंगल करताना दिसत आहेत. ह्यामधून होणारा सामाजिक द्वेष, ह्यामधून होणारी सामाजिक हेटाळणी याचा अंदाज अजून अनेकांना आलेला नाही. ज्या झोपडपट्टीमध्ये कोरोना लागण झालेलं घर सापडतं  त्या झोपडपट्टीमधून त्याला बाहेर काढल जातं. किंबहुना त्याच्या घरादारासकट त्याच्या मुलाबाळासकट त्याला बाहेर फेकल जातं हे किती जणांना माहितीये. बातम्यांसाठी किंवा दिवसभर एखादा विषय चघळण्यासाठी ठिक आहे. पण, त्याचे सामाजिक परिणाम, दुष्परिणाम याचा कधी कोणी विचार केला आहे का ? असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. 

आज पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या पत्रकारांच्या चाचण्या करुन घेतल्या. त्यामधील किती निगेटिव्ह आणि किती पाँझिटिव्ह हे सांगण्याची बाब नाहिये. पण, असे सामाजिक जाणीव असलेले नेते समाजामध्ये हे युद्ध पुढे येऊन लढत आहेत. आज मुंब्रा-कळवा मध्ये मी आणि माझी पत्नी मिळून 80 हजार खिचडीचे वाटप करीत होतो. आज आम्ही दोघेही घरी बसलो आहोत. जेव्हा एखादा सेनापती घरी बसतो तेव्हा त्याचे मागचे सैन्य मरगळतं. आज ह्या 80 हजार खिचडी वाटपाच काय होणार ? हे कालपासून हेटाळणी आणि कुचाळक्या करणारे लोक सांगतील का ? असा ही प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केलाय. 

धक्कादायक ! "कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात 'ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी’ची जास्त मागणी”

जर या चाचण्या झाल्या नसत्या तर हा आजार किती पसरला असता याची कल्पनाच न केलेली बरी. मी काही फार मोठा तीर मारला असा माझा दावा नाही. एक सामाजिक जाणीव म्हणून मी हे केलं. मंत्रिमंडळातील माझे सहकारी एकनाथ शिंदे यांनी सुद्धा ठाण्यातील तमाम पत्रकारांच्या चाचण्या करून घेतल्या. जे मी केलं ते उद्या धनंजय मुंडे सुद्धा करणार आहेत. कारण ही एक चांगलीच गोष्ट आहे. आपल्या माणसांची आपण काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार? जे मी, एकनाथ शिंदे  करत आहोत ते करायची ताकद असलेला एक प्रचंड मोठा उच्चभ्रू मध्यमवर्ग आणि धनिक वर्ग आपल्या देशात आहे. आपल्या खिशात जर 10 हजार असतील तर 4 हजार रुपयाची टेस्ट एखाद्या गरीबाची करुन घेण्याची दानत जर दाखवली तर हा रोग तर आटोक्यातच येईल, असा सल्ला ही त्यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister jeetendra awhad angry on social trollers and biased media