लोकलमध्ये अल्पवयीन भिक्षेकरी वाढले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019


स्वयंसेवी संस्थांना माहिती देण्याबाबत प्रवाशांची उदासिनता 

मुंबई : हार्बर मार्गावरील रेल्वे डब्यांमध्ये अल्पवयीन भिक्षेकऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. लोकलच्या डब्यात हे अल्पवयीन झाडू मारून भिक्षा मागताना दिसत आहेत. त्यामुळे देशाचे उज्ज्वल भविष्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्याच आयुष्यात भीषण अंधार असल्याचे वास्तव समोर येत आहे. 

लोकलमध्ये झाडू मारुन तसेच फडक्‍याने धूळ साफ करून त्याबदल्यात भिक्षा मागताना अल्पवयीन मुले मोठ्या संख्येने दिसत आहेत. अशी मुले आढळल्यास त्यांना पोलिसांच्या किंवा स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात देण्याची आवश्‍यकता असते; मात्र बहुतांश प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिलेल्या या मुलांना शिक्षण मिळावे, तसेच त्यांची शारीरिक, मानसिक वाढ योग्यप्रकारे व्हावी, यासाठी त्यांना बालगृहात पाठवणे गरजेचे असते.

बऱ्याचदा ही मुले आपसात भांडतात व हाणामारीदेखील करतात. त्यावेळी प्रवासी केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसतात. याविषयी चाईल्डलाईनशी संपर्क साधला असता पथक तयार करून हार्बर मार्गावरील स्थानकांची पाहणी करुन अशा मुलांविषयी योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अशा बालकांना चाईल्डलाईन, प्रेरणा स्वयंसेवी संस्था किंवा सलाम बालकसारख्या संस्थांच्या माध्यमातून मुक्त करून बाल कल्याण समितीपुढे न्यायला हवे. त्यांचे पुनर्वसन करून मुख्य त्यांना प्रवाहात आणणे त्यामुळे सोपे जाईल.
- शंकर जाधव, अध्यक्ष, बाल कल्याण समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minor beggers increased in mumbai local