शहराच्या विकास आराखड्यावर किरकोळ चर्चा!

शहराच्या विकास आराखड्यावर किरकोळ चर्चा!
शहराच्या विकास आराखड्यावर किरकोळ चर्चा!

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहर विकास आराखडा तयार केला असून, यावर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची विशेष महासभा शुक्रवारी (ता.३०) बोलावण्यात आली होती. मात्र, या सभेत शहर विकास आराखडा कसा आहे, याची माहिती लोकप्रतिनिधींना नसल्याने धास्तावलेल्या नगरसेवक, नगरसेवकांनी किरकोळ चर्चा करत सदरची विशेष सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानंतर महापौरांनी विशेष सभा तहकूब केली. गटनेत्यांना प्रारूप शहर आराखड्याची माहिती दिल्यानंतर पुढील आठवड्यात हा विषय पुन्हा महासभेत येणार आहे.

महापालिकेच्या माध्यमातून शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी प्रारूप शहर विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने शासन निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महापौर जयवंत सुतार यांच्या निर्देशानुसार ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता होणारी ही सभा तब्बल दीड तास उशिरा सुरू झाली. महापौर जयवंत सुतार यांनी सभागृहात विशेष महासभेची माहिती दिली. या वेळी सभागृहात उपस्थित अनेक लोकप्रतिनिधींनी प्रारूप विकास आराखडा कसा असेल, यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणा केली. २००७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या अडवली-भुतिवली अशा ३० महसुली गावांचाही उक्त अंतिम विकास योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्या विषयावरही यात चर्चा करण्यात आली. सदस्यांनी प्रारूप विकास आराखड्यामध्ये कशी रचना असेल, याची माहिती सदस्यांना देण्याची मागणी महापौर आणि आयुक्तांकडे केली. मात्र शासनाकडून आलेला आराखडा हा गोपनीय असल्याने पहिल्यांदा आपण त्याला मंजुरी देऊ; मग त्यावर असणारी लोकप्रतिधींची मते, हरकती घेऊ, असे महापौरांनी स्पष्ट केले. परंतु त्यावर त्यांचे समाधान झाले नाही. 

विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नगरसेविका नेत्रा शिर्के, नगरसेवक नामदेव भगत, एम. के. मढवी, नगरसेविका शुभांगी पाटील यांनी आपली मते मांडली. अखेर झालेल्या ऊहापोहानंतर सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी याची माहिती किमान सर्वपक्षीय नेत्यांना द्यावी; त्यांच्याकडून त्या-त्या गटाच्या लोकप्रतिनिधींना ती दिल्यानंतर सभागृहात चर्चेला आणावा, असे सांगत सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्याला विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौरांनी ही सभा तहकूब केली.


अवघे ६३ लोकप्रतिनिधी सभागृहात; ज्येष्ठांची दांडी
सत्ताधारी आणि विरोधी गटातील मिळून अवघे ६३ लोकप्रतिनिधी सभेला हजर होते. विशेष म्हणजे या सभेत स्थायी समितीचे सभापती नवीन गवते, माजी सभापती सुरेश कुलकर्णी, माजी उपमहापौर अशोक गावडे, माजी उपमहापौर अविनाश लाड आणि रामचंद्र घरत असे जेष्ठ नगरसेवक सभागृहात हजर नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com