सरकारच्या पाठिंब्यामुळेच अल्पसंख्याकांवर हल्ले - सचिन सावंत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मुंबई - कोल्हापुरातील चंदगड येथे रविवारी प्रार्थनेसाठी जमलेल्या ख्रिश्‍चन धर्मीयांवर कट्टरवाद्यांकडून दगडफेक करून तलवारीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून, काही जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेला चार दिवस उलटूनही अद्याप हल्लेखोरांना अटक करण्यात आली नाही. सरकार आणि पोलिस प्रशासनाच्या पाठिंब्यामुळेच अल्पसंख्याक समाजावर कट्टरवाद्यांकडून हल्ले सुरू आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

सावंत म्हणाले, की 23 डिसेंबर रोजी कोल्हापूरच्या चंदगडमधील न्यू लाइफ फेलोशिप या चर्चमध्ये 40 ख्रिश्‍चन धर्मीय प्रार्थनेसाठी जमले होते. या वेळी दुचाकींवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी प्रार्थना करणाऱ्या भाविकांवर बिअरच्या बाटल्या आणि दगडफेक करीत तलवार व लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात 10 ते 12 लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लांछनास्पद असून, देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून दलित, अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षांकडून देशात धर्मांधतेचे विष पेरले जात आहे.

मोदी सरकारचा सबका साथ सबका विकासचा बनावटी मुखवटा गळून पडला असून, खरा धर्मांध चेहरा समोर आला आहे. सरकारने हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे, अशी मागणी सावंत यांनी केली.

Web Title: Minority attacks on the governments support Sachin Sawant