
Crime News : मिरा रोड येथे श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; दुर्गंधी आल्याने दरवाजा तोडल्यावर घरात फक्त पायाचे तुकडे...
भाईंदर : मिरा रोडच्या नयानगर भागात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेचे तुकडे करून तिची हत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
मनोज (५६) आणि सरस्वती (३२) हे गेल्या काही वर्षांपासून नयानगर फेज-७ येथे राहत होते. त्यांच्या खोलीतून काही दिवसांपासून दुर्गंधी येत होती. याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घराची पाहणी केली असता सरस्वतीची हत्या झाल्याचे समोर आले.
यात तिच्या मृतदेहाचे काही तुकडेही करण्यात आले होते. दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता घरात पायाचे तुकडे होते. अन्य अवयवाची आरोपीने विल्हेवाट लावल्याचे समजते. मनोज आणि सरस्वती यांच्यात सतत भांडणे व्हायची अशी प्राथमिक माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.
दोघे गेल्या तीन वर्षापासून नयानगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. हत्येचे नेमके कारण काय आहे , याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिरारोड मधील घटना दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती असल्याचे दिसते. श्रद्धा वालकर या तरुणीची प्रियकराने निर्घृणपणे हत्या केली होती.