रेल्वे प्रवासात गहाळ झालेले सामान मिळाले सुखरूप

File Photo
File Photo

ठाणे : रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या गहाळ झालेल्या बॅग व साहित्य रेल्वे प्रशासनाने संबंधित प्रवाशांना परत केल्याच्या घटना गुरुवार आणि शुक्रवारी घडल्या. पुण्याहून आलेल्या दाम्पत्याची बॅग व १८ हजार रुपये, तर हैद्राबादच्या तरुणाची बॅग व ड्रोन कॅमेरा असे साहित्य रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांना सुखरूप परत केले.

मुंबईला जाण्यासाठी रेल्वेने गुरुवारी ठाणे स्थानकात उतरलेल्या माधव आणि मालिनी बांदेकर या पुणेकर दाम्पत्याची बॅग फलाट क्रमांक ३-४ वर चुकून राहिली होती. दरम्यान फलाटावर कर्तव्य बजावत असलेल्या सुरक्षा बोर्डाचे सुरक्षारक्षक नीलेश जाधव यांनी सदरची बॅग ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात जमा केली. त्यानंतर, उपप्रबंधक एस. के. गुप्ता यांच्यासमोर बॅगेची तपासणी केली. तेव्हा या बॅगेत कपडे, चप्पल आणि १८ हजार २१५ रुपयांची रक्कम मिळून आली.

हा प्रकार गुरुवारी रात्री ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास घडला. त्यानंतर तासभरातच बांदेकर दाम्पत्य प्रबंधक कार्यालयात आल्यावर गुप्ता यांनी बांदेकर दाम्पत्याची बॅग त्यांच्या स्वाधीन केली. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ठाणे-वाशी लोकलमध्ये गहाळ झालेल्या हैद्राबादच्या फोटोग्राफरचा ड्रोन कॅमेरा असलेली बॅग ठाणे स्थानकातील कर्मचाऱ्यामुळे सुखरूप परत मिळाली.

आबू झुबेर असे या फोटोग्राफरचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास वाशी-ठाणे लोकलमध्ये कॅमेरा असलेली बॅग तो विसरला. मोटरमनने ती बॅग फलाट क्रमांक दहावर ठेवून त्याची माहिती स्थानक प्रबंधक कार्यालयाला दिली. त्यानुसार, बॅगेची तपासणी केली असता आत महागडा ड्रोन कॅमेरा आढळला.

त्यानंतर काही वेळातच झुबेर ठाणे स्थानकात परतल्यानंतर प्रभारी रेल्वे प्रबंधक रवी नांदुरकर यांच्या उपस्थितीत पडताळणी करून बॅग सुखरूप परत केली. रेल्वे प्रवासात विसरलेले सामान सुखरूप परत मिळाल्याने पुणेकर दाम्पत्यासह फोटोग्राफर झुबेर या दोघांनीही रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com