आयुक्तांविरुद्ध अविश्वास

File Photo
File Photo

ठाणे : महापालिका सर्वसाधारण सभेत महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित न राहिल्याने सत्ताधारी शिवसेनेची पुरती कोंडी झाली. प्रशासनाने अचानक बहिष्कार-अस्त्र उगारल्यानंतर विरोधकांच्या साथीने अखेर शिवसेनेने आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला. तसेच या ठरावाला अधिक कायदेशीर स्वरूप येण्यासाठी केवळ अविश्वासाच्या ठरावासाठी विशेष सभा घेण्याचे सूतोवाच या वेळी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाण्यात महापालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष टिपेला पोचण्याची शक्‍यता आहे.

मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतील प्रशासनाचे अनेक विषय नामंजूर करण्यात आले होते. त्याचे पडसाद आजच्या सभेत उमटण्याची शक्‍यता व्यक्त होत होती; पण प्रशासनाने थेट बहिष्काराचे अस्त्र वापरल्याने काही काळ सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली होती. महापलिका आयुक्तांसह महापालिकेचे सचिव आणि सर्व अधिकाऱ्यांनी सभेकडे पाठ फिरवली होती.

या वेळी काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी या विषयावर आक्रमक होत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव मांडला. तसेच त्याला शिवसेनेने पाठिंबा देण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे सभेवर बहिष्कार टाकणे म्हणजे केवळ महापौरांचा नाही, तर सर्व सभागृहाचा अपमान झाला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. अखेर माजी महापौर अशोक वैती यांनी चव्हाण यांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले.

त्याचबरोबर या विषयावर विशेष सभा घेण्याची मागणी केली. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी लवकरच या विषयावर विशेष सभा घेण्याचे सूतोवाच केले. विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनीही अशा प्रकारे प्रशासनाने सभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकणे चुकीचे असल्याचे सांगितले. 

महापौर नगरसेवकांवरच कडाडल्या
अधिकाऱ्यांनी सभेला गैरहजर राहण्याची आजची पहिली वेळ नाही. आज सर्व जण प्रशासनाच्या विरोधात बोलत आहात; पण यापूर्वी तुमची बाजू घेऊन मी प्रशासनाबरोबर दोन हात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुमच्याकडून एकमुखी साथ मला मिळाली नसल्याचे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आज नगरसेवकांना सुनावले.

प्रशासनाकडून आलेल्या चोरीच्या प्रस्तावांना आपण विरोध केला असल्यामुळेच प्रशासनाने आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या वेळी केला. एवढेच नव्हे, तर मी आयुक्तांबरोबर यापूर्वीही तडजोड केली नसून भविष्यातही तडतोड करणार नसल्याचा इशारा दिला.

भाजपचा सेनेला टोला
भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी मात्र यानिमित्ताने सत्ताधारी शिवसेनेला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचा टोला लगावला. आपल्या सोयीने प्रशासनाची वारंवार बाजू घेतल्यानंतर तसेच एखाद्या नगरसेवकाला प्रशासनाकडून लक्ष्य करण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही कधीही त्या नगरसेवकाला मदतीचा हात दिला नसल्यानेच आज सत्ताधाऱ्यांवर ही वेळ आली असल्याची टीका त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com