मोंदीच्या उपस्थितीत खाजगी कार्यक्रमात राजमुद्रेचा गैरवापर?

महेश पांचाळ
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

शहिदच्या सन्मानासाठी हा आमदार लोढा यांच्या पुढाकाराने हा चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात होता. लोकसभा निवडणुका होण्याअगोदर हा कार्यक्रम झाल्यामुळे कोणताही राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न नव्हता.

- निमंत्रक सुनील राणे 

मुंबई - शहिदांच्या सन्मानार्थ महालक्ष्मी रेसकोर्सवर लोकसभा निवडणुकांपुर्वी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 27 जानेवारी 2014 रोजी झालेल्या खासगी कार्यक्रमात लोढा फाउंडेशन व शहिद गौरव समितीच्या वतीने राजमुद्रेचा गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, यासंदर्भात गेले दोन वर्ष संथ तपासानंतर भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या संस्थेला पोलिसांनी क्‍लिनचीट दिली आहे. विद्यमान आमदारांना विधानभवनाचे चिन्ह आणि राजमुद्रा वापरण्याबाबत विधीमंडळाचे नियम असताना खाजगी कार्यक्रमासाठी याचा वापर होउ शकतो का? असा नवा प्रश्‍न या तक्रारीच्या निमित्ताने निर्माण झाला आहे.

सन 1962 मध्ये भारत-चीन युद्धात शहिद झालेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ व स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या "ऐ मेरे वतन के लोगो..." या गाण्यास 50 वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून लोढा फाउंडेशन व शहिद गौरव समितीच्यावतीने 27 जानेवारी 2014 मध्ये दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. 
भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या खाजगी कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवरील लिफाफ्यावर राजमुद्रा व विधानभवन चिन्हांचा वापर करुन कार्यक्रम शासकीय असण्याचे भासविण्याचा आरोप करत याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व प्रचारक यशवंत शिंदे यांनी ना. म.जोशी पोलीस ठाण्यात केली होती. 

परंतु, पोलिसांनी सुरुवातीला तक्रारदाराने खोडसाळपणा केल्याचा निष्कर्ष काढत प्रकरण दफ्तरी दाखल केले होते. यावर शिंदे यांनी पोलिसांच्या या निष्कर्षाला आव्हान दिले. तक्रारीत तथ्य नसेल तर माझ्यावर फौजदारी कारवाई करा, असा अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्यानंतर याप्रकरणाची नव्याने चौकशी सुरु झाली. त्यानंतर, ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी अरगडे यांनी लोढा फाउंडेशनचे संयोजक सचेतन घरत, सोहनलाल जैन, निमंत्रक सुनील राणे, सिद्धार्थ गमरे, प्रशांत गमरे यांचे जबाब घेतले. सोहनलाल जैन यांनी राजमुद्रा व विधानभवनाचे चिन्ह असलेल्या काही लिफाफ्यांच्या वापराबाबत लेखी जबानीत मान्य केलेले असताना पोलिसांनी याकडे दुर्लक्ष कसे केले, असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, हा तपास पुन्हा दुसऱ्या अधिकारी शुभदा चव्हाण यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यांच्या तपासात तक्रारीत तथ्य आढळल्याचे माहिती अधिकार पत्रातून पुढे आले. विधानसभा अध्यक्ष व प्रधान सचिव ,विधीमंडळ यांना पत्र लिहून कारवाईसंदर्भातील अभिप्राय द्यावा, अशी विनंती पोलिसांनी केली होती. प्रधान सचिवांकडून कारवाईसाठी कायदेशीर सल्ला घेण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. मात्र, या प्रकरणाला कलाटणी देणारी घटना पुन्हा घडली. तपास अधिकाऱ्याची बदली करुन, हे प्रकरण पोलीस अधिकारी संपत चेमटे यांच्याकडे वर्ग केले. दोन्ही संस्थांकडून राजमुद्रांचा दुरोपयोग केला नसल्याचे स्पष्ट करत चेमटे यांनी त्यांना क्‍लिनचीट दिली.

दरम्यान, या तक्रारीसंदर्भात तपास पूर्ण झाला असून, चौकशीत तथ्य आढळले नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रविण पडवळ यांनी दिली आहे. तर, पोलिसांनी नीट तपास केला नसल्याने त्यांच्याविरोधातही कारवाई व्हावी, यासाठी आपण न्यायसंस्थेकडे दाद मागणार असल्याचे यशवंत शिंदे यांनी सांगितले.

तक्रारीत तथ्य नसल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे. खोटी तक्रार केली म्हणून संबंधितांविरोधात तक्रार दाखल करणार आहे.

- आमदार मंगलप्रभात लोढा

Web Title: misuse of rajmudra in Narendra Modi Programme