ठाण्यात आरटीआयचा पुन्हा गैरवापर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

ठाणे : माहिती अधिकार कायद्याचा (आरटीआय) गैरवापर करण्याचे सत्र ठाण्यात सुरूच असून एका कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिव्यांग लाभार्थ्याला खंडणीसाठी धमकावल्याचा प्रकार शनिवारी ठाण्यात उघडकीस आला आहे. परेश चावडा असे या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे नाव असून याप्रकरणी त्याच्याविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

लोकमान्य नगर परिसरात राहणारे योगेश पाडले (34) हे दोन्ही पायांनी अपंग असल्याने त्यांना तीन वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेच्या दिव्यांग लाभार्थी योजनेतून सावरकरनगर येथील सार्वजनिक वाचनालयानजीक एक स्टॉल देण्यात आला आहे. या स्टॉलमध्ये पाडले यांनी कटलरी दुकान थाटले असून त्यावरच त्यांचा व कुटुंबियांचा उदरनिर्वाह होतो. त्यांच्या गैरहजेरीत दुकानात त्यांचा मित्र बसत असल्याने ऑक्‍टोबर महिन्यात चावडा याने, अपगांच्या नावाने दुकान मिळवून दुसऱ्याला भाड्याने दिल्याची तक्रार ठाणे महापालिकेत करून स्टॉल रद्द करावयास लावतो अशी धमकी देत तक्रार न करण्यासाठी 20 हजारांची खंडणी मागितली. तेव्हा घाबरून 10 हजारांची रक्कम त्यांनी चावडा याला दिली. तरीही उर्वरित रकमेसाठी धमकावणे सुरूच होते.

बुधवारी (ता. 26) चावडा याने उर्वरित रक्कम न दिल्यास थेट ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पाडले यांनी केला असून याबाबत त्यांनी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पी. बी. यादव करीत आहेत.

Web Title: Misuse of RTI in Thane