मंत्रालयाच्या पायऱ्यांवर आमदारांचे आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

मुंबई - औरंगाबाद दंगलीप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट नाकारल्याने कॉंग्रेस, समाजवादी पक्ष, "एमआयएम' आदी पक्षांच्या आमदारांनी मंत्रालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. कॉंग्रेसचे आमदार आसिफ शेख, अब्दुल सत्तार, समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी, "एमआयएम'चे आमदार इम्तियाज जलील, वारीस पठाण आंदोलनात सहभागी झाले होते. औरंगाबादमध्ये गेल्या आठवड्यात किरकोळ कारणावरून दंगल उसळली होती. त्यात मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड झाली होती; तसेच शंभर व्यापाऱ्यांची दुकाने जाळण्यात आली होती. या संदर्भातील काही सीसीटीव्ही फुटेजही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्याआधारे हल्लेखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अब्दुल सत्तार, आसिफ शेख, अबू आझमी, इम्तियाज जलील, वारीस पठाण या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे "वर्षा' बंगल्यावर भेटीची वेळ मागितली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ न दिल्याने या आमदारांनी मंत्रालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले.
Web Title: mla agitation on mantralaya steps