उल्हासनगरमध्येही राष्ट्रवादीला खिंडार; आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश?

अजय दुधाणे
शुक्रवार, 26 जुलै 2019

मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस झटका दिला असताना, उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी ह्या भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

उल्हासनगर : मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेस झटका दिला असताना, उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी ह्या भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

उल्हासनगरचे राजकारण म्हणजे कलानी परिवार हे एक सूत्र बनून गेले आहे, उल्हासनगरचा कुप्रसिद्ध डॉन पप्पू कलानी हा सर्वाना परिचित आहे, पप्पू कलानी उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत चार वेळा निवडून आला आणि एकदा भाजपच्या कुमार आयलानी यांच्याकडून पराभूत झाला, या काळात पप्पू कलानी याला घनश्याम भटिजा मर्डर केसमध्ये आजन्म कारावासाची शिक्षा झाल्यावर पप्पू कलानी निवडणूक लढवु न शकत असल्याने नंतर कलानी यांची धुरा त्यांची पत्नी ज्योती कलानी यांनी सांभाळली आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्योती कलानी यांनी भाजपच्या कुमार आयलानी यांचा भरघोस मतांनी पराभव केला, त्यावेळी मोदी लाट असताना राज्यात राष्ट्रवादीच्या एकमेव महिला आमदार निवडून आल्या होत्या.

दरम्यान कलानी परिवाराने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तसेच उल्हासनगर शहरात एक कलानी समर्थकांची बैठक घेऊन, येत्या विधानसभा निवडणुकीत कलानी परिवारातील कोणीतरी एक व्यक्ती निवडणूक लढणार असून त्यात त्या स्वता किंवा त्यांचा मुलगा ओमी गरज पडल्यास सून पंचम ओमी कलानी या निवडणूक लढणार, मात्र या कलानी परिवार समर्थकांच्या मेळाव्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांचे धाबे दणाणले, कलानी परिवाराने नुकतीच मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट आणि त्याच्यात झालेली चर्चा सूत्रांकडून बाहेर येत आहे. लवकरच उल्हासनगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार ज्योती कलानी या भाजप मध्ये प्रवेश करणार असून, फक्त प्रवेश कधी आणि केव्हा करायचा हे ठरणे बाकी असून, मात्र ज्योती कलानी या भाजपच्या वाटेवर आहेत, अशी माहिती सूत्रांकडून आली आहे.

कलानी परिवाराने भाजप मध्ये प्रवेश केल्यास भाजपस महाराष्ट्रात सिंधी समाजाची मते आपल्याकडे वळविण्याचा फायदा होणार असून, भाजपने राज्यातील निवडून येणाऱ्या हुकमी आमदार आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावला असताना, आता कलानी परिवारसुद्धा भाजपच्या गळाला लागला की काय? अशी उलट सुलट चर्चा शहरात सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Jyoti kalani may Enters in BJP