एमएमसीची डॉक्‍टरांवर करडी नजर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - डॉक्‍टरांविरोधातील जास्तीत जास्त तक्रारी निकाली काढण्यासाठी व दोषी डॉक्‍टरांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने (एमएमसी) कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे यापुढे डॉक्‍टरांवर एमएमसीची करडी नजर राहणार आहे. एमएमसी कोणालाही पाठीशी घालणार नसून, आतापर्यंत डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाविरोधातील ६५० तक्रारी निकाली काढल्याचे एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले. 

दिवसेंदिवस वाढत असलेल्या डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाच्या तक्रारींचा निपटारा करण्याबरोबरच  बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या डॉक्‍टरांवर लक्ष ठेवण्यासाठी एमएमसीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. एमएमसीकडे आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत कारवाई करण्यात येत आहे. सहा महिन्यांत रुग्णांच्या उपचारांतील हलगर्जीपाणाच्या १४०० तक्रारी एमएमसीकडे दाखल झाल्या होत्या. त्यातील ६५० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. दाखल तक्रारींपैकी अनेक तक्रारी या ३० वर्षे जुन्या असल्याचे डॉ. उत्तुरे यांनी सांगितले. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत डॉक्‍टरांविरोधात झालेल्या तक्रारींचाही उत्तुरे यांनी या वेळी उल्लेख केला. अशा प्रकरणांमध्ये ४० डॉक्‍टरांविरोधातील तक्रारी निकाली काढल्याचे ते म्हणाले. अनेक तक्रारी या ॲप्रन न घालणे, दरवाजावर मराठी पाटी नसणे, अशा किरकोळ होत्या, अशी माहितीही त्यांनी दिली. 

तक्रारदार पुन्हा येत नाहीत
डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाच्या तक्रारी निकाली काढण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी काऊन्सिलर नसल्याने अडचण येत होत्या; परंतु सहा महिन्यांपासून तक्रारींवर कारावाईची प्रक्रिया नियमित सुरू आहे. ज्या तक्रारी शिल्लक आहेत, त्यातील काही तक्रारींमध्ये तक्रारदार पुन्हा आलेच नसल्याने प्रकरण प्रलंबित असल्याची माहिती एमएमसीचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली.

Web Title: MMC took drastic steps to take action against the doctors