मेट्रो मार्गावर खासगी वाहतुकीचा एमएमआरडीएचा निर्णय

मेट्रो मार्गावर खासगी वाहतुकीचा एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई - बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असतानाच एमएमआरडीए मेट्रो-१ प्रकल्पातील पवई ते साकीनाका मार्गावर खासगी संस्थांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देणार आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या बस सेवेला फटका बसण्याची शक्‍यता असल्याने फेरविचार करावा, अशी मागणी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी  केली आहे. 

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट आणि टोयोटा मोबिलिटी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मेट्रो-१ मार्गावर पवईपासून घाटकोपर, जागृतीनगर, मरोळ आणि साकीनाका अशा चार स्थानकांपर्यंत प्रवासी वाहतूक करण्यास खासगी संस्थेला मान्यता दिली आहे. त्या मार्गावर चार स्थानकांपर्यंत १२ आणि २२ आसनी बसगाड्या चालवण्यात येतील. तो प्रयोग यशस्वी झाल्यास कालांतराने अन्य मेट्रो मार्गांवरही खासगी संस्थांना बससेवा चालवण्यास मान्यता देण्यात येईल. त्यामुळे भविष्यात बेस्ट उपक्रमावर संकट येईल, अशी भीती स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केली.  बेस्ट पालिकेचा अंगीकृत उपक्रम आहे. त्यामुळेच पालिकेने तोट्यातील बेस्ट उपक्रमाला २१३६ कोटी रुपये अनुदानाच्या स्वरूपात दिले आहेत. त्यानंतर बेस्ट उपक्रमाने प्रवासी भाड्यात कपात करून मोठ्या संख्येने वातानुकूलित मिडी आणि मिनी बसगाड्या खेरदी करण्याचे ठरवले. त्यापैकी काही बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखलही झाल्या आहेत. पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व विद्यमान मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बसगाड्यांचे उद्‌घाटनही झाले. 

बेस्टच्या ताफ्यात येणाऱ्या बसची संख्या लवकरच ४०० पर्यंत जाईल, असा प्रशासनाने दावा आहे. उपक्रमाच्या ताफ्यात नुकत्याच २५ मिनी एसी बसची भर पडली आहे. १४९ बसची नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याने त्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत येतील, असेही बेस्टने स्पष्ट केले आहे. असे असताना मेट्रो मार्गावर चालणाऱ्या खासगी बस बेस्टसाठी अडचणीच्या ठरणार आहेत.

राज्य सरकारच्या अखत्यारीतील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो-१ मार्गावर खासगी संस्थेला बस सेवा चालवण्यास परवानगी देणार आहे. अशी प्रवासी वाहतूक बेस्ट उपक्रमासाठी धोक्‍याची ठरेल.
- यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती, मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com