नवी मुंबई मेट्रोचे संचालन एमएमआरडीएकडे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

निविदांना प्रतिसाद नाही

मुंबई : नवी मुंबई मेट्रो चालवण्याबाबतच्या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने ही जबाबदारी स्वत:च घेण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) विचार आहे. याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेलापूर ते पेंधर या मार्गावर नवी मुंबई मेट्रो चालवण्यात येणार आहे. या मार्गावर ११ स्थानके असतील. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई मेट्रोला हिरवा कंदील दाखवला होता. या मेट्रोमार्गासाठी सुरुवातीला सिडको ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम पाहत होती. तब्बल ३०६४ कोटी रुपये अंदाजित खर्चाची ही मेट्रो चालवण्यासाठी सिडकोने अनेकदा निविदा प्रसिद्ध केल्या; तसेच मुदतीत वाढही केली, परंतु या निविदांना प्रतिसाद मिळालाच नाही.

एमएमआरडीएने महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ही उपकंपनी स्थापन केली आहे. निविदांना प्रतिसाद न मिळाल्यामुळे या उपकंपनीमार्फत नवी मुंबई मेट्रोचे संचालन आणि देखभाल करण्याचा एमएमआरडीएचा प्रस्ताव आहे. सध्या एमएमएमओसीएलकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. त्यामुळे तीन-चार महिन्यांत रिक्त पदे भरल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

निर्णय लवकरच
मेट्रो प्रकल्पातील बांधकामांचा संपूर्ण खर्च सिडको करणार असून, आतापर्यंत ३००० कोटी रुपये खर्च झाला आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेचा भाग असलेली नवी मुंबई मेट्रो सेवा खासगी कंपनीकडे देण्याऐवजी सरकारी प्राधिकरणामार्फत चालवणे जनहिताचे असल्याची भूमिका सिडकोने घेतली आहे. नवी मुंबई मेट्रो सेवेतून मिळणाऱ्या महसुलातील वाट्याबाबत सिडको व एमएमआरडीए यांच्यात चर्चा सुरू आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एमएमआरडीएचे प्रवक्ते दिलीप कवठकर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MMRDA runs Navi Mumbai Metro