एमएमआरडीएची कक्षा वाड्यापर्यंत वाढवा; राजकीय पक्षांची मागणी 

दिलीप पाटील 
शनिवार, 1 डिसेंबर 2018

वाडा तालुका हा प्राधिकरणाच्या कक्षेत घ्यावा अशी शिवसेनेची मागणी असून यासंदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली असून लवकरच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी शिष्टमंडळासह भेटणार आहेत.
- सुनिल पाटील, उपजिल्हाप्रमुख,शिवसेना पालघर 

वाडा : अलीकडेच एमएमआरडीए ची कक्षा वाढवून ती पालघर डहाणू पर्यंत करण्यात आली असून यापूर्वीच भिवंडी महानगरपालिका व अंबाडी पर्यतचा भाग हा या कक्षेत येतो. मात्र अंबाडी नंतर प्राधिकरणाची हद्द संपते. अंबाडी पासून नजीक असलेल्या वाडा तालुक्याच्या विकासासाठी एमएमआरडीएची कक्षा वाडा पर्यंत वाढवावी अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केली आहे.

वाडा तालुक्याच्या आदिवासी व मागास भागाचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने सन 1992 ला वाडा तालुका हा' डी प्लस झोन 'म्हणून जाहीर केला. डी प्लस झोन जाहीर झाल्यानंतर उद्योजकांना अनेक सवलती देण्यात आल्या.यामध्ये 35 टक्के कर्जात सवलत ,विजेच्या बीलावर काही टक्के सुट, आयकर विक्रीकर वर काही प्रमाणात सुट अशा अनेक सवलती सरकारने उद्योजकांना दिल्या. या सवलती मिळाल्यामुळे अनेक कारखानदारांनी आपला मोर्चा वाड्याकडे वळवून आपले बस्तान बसविले.आजमितीस वाडा तालुक्यात एक हजारांहून अधिक कारखाने आहेत.

कारखानदारी आली असली तरी त्यांना हव्या त्या सोयी सुविधा सरकारने पुरवल्या नाहीत. रस्त्यांची दुरवस्था, पाणी , विजेची समस्या या सुविधा सरकारने न पुरवल्याने उद्योजकांना अनेक सुविधांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांच्या बाबतीत म्हणायचे तर पुर्वी गावासाठी बनवलेल्या 20 ते 30 टन वजनाच्या वाहनासाठी बनवलेल्या रस्त्यावर 80 ते 90 टन वजनाची कारखानदारांची वाहने जाऊ लागल्याने रस्त्यांची दुरवस्था होऊ लागली. नविन रस्ता बनवला तरी तो दोन तीन महिन्यात पुन्हा खड्डेमय होत असे. त्यामुळे उद्योजकांच्या वाहनांचे मोठे नुकसान होत असे.आता ए क दोन वर्षात काही प्रमाणात सिमेंट क्राॅकीटीकरणाचे रस्ते झाले असले तरी रस्त्याची समस्या पूर्णपणे संपलेली नाही. विजेबाबतही तिच समस्या होती. वर्षानुवर्ष विजेच्या प्रतिक्षेत उद्योजक होते मात्र आता भावेघर, तानसा फाॅर्म,कोकाकोला,आबिटघर येथे विद्युत केंद्रे झाल्याने आता कुठे वीजेचा प्रश्न संपुष्टात आला आहे. पाण्याबाबत तर सरकारने उद्योजकांनासाठी काहीही केलेले नाही.उद्योजकांनी कुपनलिका मारून किंवा टॅकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. काही उद्योजकांना वेळेत सुविधा न मिळाल्याने किंवा सवलती बंद झाल्याने त्यांनी कारखाने बंद करून आपला मोर्चा गुजरात कडे वळवला आहे. डी प्लस झोन तालुका झाला असला तरी सुविधा न मिळाल्याने अनेक कारखानदार समस्या ग्रस्त बनले आहेत.

अलिकडेच एमएमआरडीए प्राधिकरणाने आपली कक्षा वाढवून ती आता पालघर डहाणू पर्यंत नेली आहे. त्यातच भिवंडी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाडा तालुक्यात प्राधिकरणाची कक्षा वाढविल्यास वाड्याच्या विकासाला चालना मिळेल. भिवंडीमध्ये जागे अभावी विस्ताराला आता वाव राहिला नाही.तसेच वाड्यात अद्याप पडीक जागा मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे गोदामे कारखाने यांचे जाळे होऊन विस्ताराला वाव आहे. उद्योजकांना सुविधा पुरवल्यास आणखी कारखाने येऊन रोजगाराच्या हातालाही काम मिळेल. एमएमआरडीए मुळे रस्ता, पाणी, उड्डाणपूल आदी विकासात्मक कामासाठी करोडोचा निधी उपलब्ध होऊन वाडाचाही झपाट्याने विकास होईल यासाठी प्राधिकरणाची कक्षा वाडा पर्यंत वाढवा अशी मागणी विविध राजकीय पक्षांनी केली आहे.

मेट्रो रेल ही एमएमआरडीए अंतर्गत येते. मेट्रो पाच चे काम अंत्यत वेगाने ठाण्यामध्ये सुरू आहे. जी पुढे ठाणे-कल्याण-भिवंडी अशी जात आहे. वाड्याचा समावेश झाल्यास विस्तारीत मेट्रो पाच भिवंडी हून वाड्यापर्यत जाऊ शकते. पुढे ती पालघरला जोडता येईल. आणि शंभर वर्षाचे रेल्वेचे स्वप्न वाडा वासीयांचे साकार होईल. हजारो कामगार व स्थानिक नागरिकांना ये जा करण्याची सोय होईल. रस्त्यावरील ताणही कमी होईल. शेतक-यांचा माल थेट मुंबई च्या बाजारपेठेत शेतक-यांना नेता येईल. विद्यार्थांच्या शिक्षणासाठीही सोय होईल.    

वाडा तालुका हा प्राधिकरणाच्या कक्षेत घ्यावा अशी शिवसेनेची मागणी असून यासंदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली असून लवकरच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याशी शिष्टमंडळासह भेटणार आहेत.
- सुनिल पाटील, उपजिल्हाप्रमुख,शिवसेना पालघर 

मुंबई महानगरपालिकेसाठी वाड्यातील पिंजाळ येथे मोठे धरण बांधून हे पाणी मुंबईला देण्याचा घाट घातला आहे. जर आमचे पाणी नेणार असाल तर आमच्या तालुक्याच्या विकासासाठी काही करणे गरजेचे आहे. त्यासाठी आमचा तालुका प्राधिकरणाच्या कक्षेत घ्यावा. 
- प्रफुल्ल पाटील, अध्यक्ष- काँग्रेस पार्टी वाडा तालुका 

वाडा तालुका प्राधिकरणाच्या कक्षेत घेतल्यास वाड्याचा विकास झपाट्याने होईल.यासाठी तशी मागणी आम्ही करणार आहोत. 
- रोहिदास पाटील, अध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुका 

वाडा प्राधिकरणाच्या कक्षेत यायलाच हवा.यासाठी आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री  विष्णू सवरा साहेब यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ.
- संदीप पवार, अध्यक्ष- भाजप वाडा तालुका 

एमएमआरडीए च्या कक्षेत वाडा तालुका घेतल्यास येथील नोकरदार, शेतकरी,कामगार व नागरिकांनी अनेक सुविधां मिळून त्याचा फायदा त्यांना होईल. अनेक विकासाच्या योजना राबविल्या जातील. त्यामुळे तालुक्याचा झपाट्याने विकास होईल. यासाठी प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिका-याकडे पक्षातर्फे पत्रव्यवहार केला जाईल. 
- रमेश भोईर, अध्यक्ष-रिपाई पालघर जिल्हा ( सेक्युलर)

आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून यासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे तशी मागणी करणार आहोत. 
- कांतीकुमार ठाकरे, अध्यक्ष- महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वाडा तालुका 

वाडा विक्रमगड या तालुक्यांना एमएमआरडीए च्या कार्यकक्षेत समाविष्ट करावा अशी आमची मागणी आहे. तालुका समाविष्ट केल्यास येथील अनेक प्रलंबित समस्या मार्गी लागून तालुक्याचा विकास झपाट्याने होईल. दुर्लक्षित वंचित जनतेला विकास करायचा असेल तर याशिवाय दुसरा पर्याय नाही. 
- मोहन पाटील, अध्यक्ष- ठाणे शहर कुणबी समाज सेवा संघ 

Web Title: MMRDA in wada