LokSabha 2019 : युतीविरोधात मनसे मैदानात 

MNS
MNS

मुंबई : शिवसेना-भाजप युतीविरोधात मनसे थेट मैदानात उतरणार आहे. युतीच्या उमेदवारांविरोधातील तुल्यबळ उमेदवाराला मदत करा, असे आदेशच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिले. मात्र, कॉंग्रेसचे संजय निरुपम यांच्या विरोधात "नोटा' वापरण्याचा निर्णय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. 

लोकसभा निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी कामाला लागा, असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा थेट प्रचार करायचा कसा, असा पेच कार्यकर्त्यांना पडला होता. या पार्श्‍वभूमीवर नांदगावकर यांनी शनिवारी दादर येथील पक्ष कार्यालयात पक्षाच्या मुंबईतील विभाग अध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीत युतीच्या विरोधातील तुल्यबळ उमेदवाराला मदत करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

त्यामुळे मनसे थेट कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची शक्‍यता आहे. त्याची सुरुवात दादर येथील शिवाजी पार्कमधून झाली. दक्षिण-मध्य मुंबईतील कॉंग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांच्यासोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग वॉक केला, तर पक्षाच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी उत्तर मुंबईतील कॉंग्रेस उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांना शुभेच्छा दिल्या. 

दरम्यान, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार सभांत सहभागी होऊ. त्यांना हवी ती मदत करू. पण निरुपम यांना मदत करणार नाही. त्यांच्या विरोधात "नोटा' नोंदवू. कुटुंबीय तसेच इतरांनाही तसे करण्यास सांगू, असे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
तीन मतदारसंघांत युतीच्या उमेदवारांना फटका? 
शिवसेनेने भाजपशी युती केल्यामुळे शिवसेनेचा पारंपरिक मतदार नाराज झाला आहे. कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार मनसेच्या मदतीने या नाराज मतदारांना स्वत:कडे वळवू शकतात. विशेषतः दक्षिण मुंबई, दक्षिण- मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या तीन मतदारसंघांत युतीच्या उमेदवारांना फटका बसू शकतो, असे राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com