सई, पुष्कर, भाऊ कदम मनसेच्या प्रचार फौजेत

विष्णू सोनवणे 
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

महिलांचे विशेष पथकही प्रचारयुद्धात 
नाशिकमध्ये मनसेने केलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी नुकतेच 3500 महिलांचे पथक राज ठाकरे यांच्यासमवेत गेले होते. हे पथक मुंबईत आता प्रचारात आघाडीवर राहणार आहे. मनसेची राजकीय भूमिका मतदारांपुढे मांडणार आहे. मनसेचा प्रचाराचा झंजावात सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

मुंबई - सई ताम्हणकर, भाऊ कदम, पुष्कर श्रोत्री, केदार शिंदे, नेहा पेंडसे, सायली संजीव हे कलाकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचार करणार आहेत. प्रचारफेऱ्या, चौकसभा आणि जाहीर सभांमधून हे कलाकार मनसेच्या संकल्पनेतील मुंबईच्या विकासाची ब्लूप्रिंट मुंबईकरांसमोर मांडतील. मनसेचा प्रचाराचा झंजावात येत्या सोमवारपासून (ता. 13) सुरू होणार आहे. 

शिवसेना-भाजपने प्रचारसभांद्वारे मुंबईतील निवडणुकीचे वातावरण तापविले आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोपांची राळ उडवत आहेत. दुसरीकडे मनसेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांची मुंबईत प्रचारसभा झालेली नाही. त्यामुळे मनसेच्या प्रचाराची तयारी कशी आहे, याविषयी मुंबईकरांना उत्कंठा आहे. राज यांच्या भूमिकेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. मात्र सिनेकलावंतांची फौज घेऊन राज प्रचारात उतरणार आहेत.

त्याविषयी सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी सांगितले की, मनसेच्या प्रचारासाठी मराठी सिनेसृष्टीतील, मालिकांमधील कलाकार येणार आहेत. पश्‍चिम उपनगरातील प्रचाराचे वेळापत्रक तयार झाले असून त्यात सई ताम्हणकर, भाऊ कदम, केदार शिंदे, पुष्कर श्रोत्री, सायली संजीव, नेहा पेंडसे आदी सुमारे 42 कलावंत सहभागी होणार आहेत. या कलाकारांनी नाशिकमधील अद्ययावत उद्यानाची पाहणी केली आहे. मनसे विकास प्रकल्पातून नाशिक बदलू शकते. आता मुंबई बदलण्यासाठी मनसेला संधी द्या, अशी विकासाची भूमिका अभिनेते मतदारांपुढे मांडणार आहेत. 

महिलांचे विशेष पथकही प्रचारयुद्धात 
नाशिकमध्ये मनसेने केलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी नुकतेच 3500 महिलांचे पथक राज ठाकरे यांच्यासमवेत गेले होते. हे पथक मुंबईत आता प्रचारात आघाडीवर राहणार आहे. मनसेची राजकीय भूमिका मतदारांपुढे मांडणार आहे. मनसेचा प्रचाराचा झंजावात सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

Web Title: mns campaigning start in mumbai