ये राज ठाकरे का स्टाईल हैं ! राज ठाकरेंनी मनसे नेत्यांना दिलं घरपोच सरप्राईज...  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

सध्या मुंबईत लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे.  पाचव्या टप्प्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. या टप्प्यात हॉटेल सुरु करण्याची मुभा दिली

मुंबई- सध्या मुंबईत लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे.  पाचव्या टप्प्यात काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. या टप्प्यात हॉटेल सुरु करण्याची मुभा दिली. पण केवळ पार्सल सेवेचीच परवानगी देण्यात आली. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मुंबईतल्या काही हॉटेलनी पार्सल सेवा सुरु केली. ही पार्सल सेवा सुरु होताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरमधल्या नेत्यांना एक सरप्राईज दिलं आहे. अचानक आलेल्या या पार्सलमुळे नेत्यांना आर्श्चयाचा धक्काच बसला. पण काही वेळातच या नेत्यांना हे सरप्राईज कोणी दिलं हे उघड झालं. 

मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, प्रकाश हे दादरच्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीतील एक मानाचं पान... लॉकडाऊन दरम्यान मागील 70 दिवस बंद असलेलं हे उपाहारगृह फक्त पार्सल करीता सुरु झालं आणि पहिल्याच दिवशी या उपाहारगृहातून माझ्या घरी पार्सल आलं. आश्चर्य वाटलं... नंतर कळलं की राजसाहेबांनी माझ्यासह त्यांच्या अनेक मित्र आणि स्नेही यांच्याकडे अशीच पार्सलं पाठवली.

मोठी बातमी - मुंबईकरांनो खबरदारी बाळगा, कोरोनानंतर 'या' संकटाचा सामना करा...

यावरुनच दादरमधील प्रसिद्ध प्रकाश हॉटेलनं पार्सल सेवा सुरु करताच राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांच्या घरी पार्सल पाठवलं. नेत्यांना याबाबत आधी काहीच कल्पना नव्हती. मात्र त्यानंतर त्या सर्वांना समजलं की, हे पार्सल राज ठाकरेंनी पाठवलं आहे. सरदेसाई यांनी पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आणि या पोस्टमध्ये असेच आणखी काही किस्से देखील नमूद केलेत. 

हाच त्यांचा स्वभाव... असं म्हणत हे तर एक उदाहरण झालं, पण अशाच अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. धारगळकर यांची माहीमची ‘प्रसाद बेकरी’ असो, चितळे बंधू असो की रत्नागिरीतले भिडेंचं ‘योजक’ असो. मराठी उद्योजकांकडूनच खरेदी करण्याचा त्यांचा कटाक्ष असतो. बरं, खरेदी ही एवढी की एखादी गाडी फक्त सामानानेच भरून जावी ! परदेशात गेल्यावर सुद्धा जर तिथे एखाद्या मराठी माणसाचे दुकान अथवा व्यवसाय असल्यास ते हटकून त्याच्याकडेच खरेदी करतात, असं सरदेसाई यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

तसंच पुढे सरदेसाई म्हणाले की, हे सगळं करण्याचा त्यांचा उद्देश मात्र एकच... महाराष्ट्र धर्म वाढवावा. तसंच महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल प्रचंड आत्मीयता असणाऱ्या या नेत्यासोबत मी काम करतोय याचा मला अभिमान असल्याचंही नितीन सरदेसाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. 

मोठी बातमी - 1882 च्या विनाशकारी 'द ग्रेट बॉम्बे सायक्लॉन' बद्दलची Inside Story !

सरदेसाईंनी सांगितला लंडनमधला तो किस्सा 

काही वर्षांपूर्वी आम्ही लंडनमध्ये असताना तिथे वडापावचे हॉटेल सुरु करत असल्याचे काही मराठी तरुणांनी भेटून सांगितले. राजसाहेबांनी आत्मीयतेने त्यांच्याकडून सगळी माहिती आणि त्यांच्या भविष्यातील योजना ऐकून घेतल्या आणि मुंबईत आल्यावर भेटायचे आमंत्रण सुद्धा दिले. एवढेच नव्हे तर जितके दिवस आम्ही लंडनमध्ये होतो तितके दिवस, भेटणाऱ्या प्रत्येकाला आणि नंतरही मुंबईतून लंडनला जाणाऱ्या प्रत्येक मित्राला तिथे जाऊन वडापाव खाण्याचा आदेश वजा आग्रह ते करत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief raj thackeray gave surprise to his party officials see what he did