मनसेच्या आरोपांचं महापौरांकडून खंडन, दिलं 'या' शब्दात उत्तर

पूजा विचारे
Friday, 21 August 2020

महापौरांनी आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली. त्यावर महापौरांनी आरोपांचं खंडन केलं आहे. 

मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापौर किशोर पेडणेकर यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. या आरोपानंतर किशोरी पेडणेकर यांनी हे आरोप फेटाळून लावलेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत स्वत:च्या मुलाच्या कंपनीला कोविड सेंटरचं काम मिळवून दिलं. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्विकारुन महापौरांनी आपल्या पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली. त्यावर महापौरांनी आरोपांचं खंडन केलं आहे. 

गुरुवारी संदीप देशपांडे, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी दादर येथे पत्रकार परिषद घेऊन महापौरांवर हे आरोप केले. महापौर पेडणेकर यांनी तात्काळ या आरोपांचं खंडन केलं आहे. 

अधिक वाचाः  पदवीच्या गुणांवरही MBA प्रवेश मिळणार; तंत्र शिक्षण संस्थेचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबईतील कोविड सेंटरला मनुष्यबळ पुरविण्याचे काम अनेक कंपन्यांनी केले आहे. त्यात माझ्या मुलाचीही एक कंपनी आहे. माझा मुलगा सज्ञान आहे. गेली दहा वर्षे तो व्यवसाय करत आहे. काम मिळविणे हा त्याचा हक्क आहे. कोणाला यात काही संशय येत असेल तर त्यांनी महापालिकेत जाऊन चौकशी करावी,' असं आव्हानच महापौरांनी मनसेला केलं आहे.

हेही वाचाः  मुंबईत क्वारंटाईनच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या नवे नियम

तसंच पालिकेतील सत्ता असलेल्या शिवसेनेवर आरोप करणाऱ्या मनसेचा पेडणेकर यांनी खरपूस समाचार घेतला. ही कसली पोटदुखी आहे? कोरोनाकाळात बोंबा मारायला मिळाल्या नाहीत म्हणून आरोप करताहेत की कोरोना आटोक्यात येत आहे हे बघवत नाही,असंही त्या म्हणाल्या.

मनसेचे आरोप 

महापौरांनी पदाचा गैरवापर करून आपल्या मुलाला कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून दिल्याचं ते म्हणाले होते. तसंच, महापौरांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या मुलाच्या कंपनीला वरळीतील कोविड सेंटरचं कंत्राट मिळवून दिलं. साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीने हे काम गैरमार्गाने मिळवलेलं आहे. महापालिकेने कोविड सेंटरच्या उभारणीसाठी कुठलीही निविदा प्रक्रिया राबवली नाही. थेट हे काम महापौरांच्या मुलाच्या कंपनीला दिलं. यातच सर्व काही आलं, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.

एका बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सर्वच जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना केवळ मुंबई महापालिकेचेच सभागृह बंद आहे.  महापालिकेचा हा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून सभागृह चालू दिलं जात नाही. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी केली होती.

MNS claimed Mumbai Mayor Accused Of Corruption In CCC Construction Contract Kishori Pednekar reaction


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS claimed Mumbai Mayor Accused Of Corruption In CCC Construction Contract Kishori Pednekar reaction