अधिकाऱ्यांचे चोचले आधी बंद करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

पालिकेच्या कामगारकपातीवरून मनसेची टीका

पालिकेच्या कामगारकपातीवरून मनसेची टीका
मुंबई - प्रशासकीय कारभारावर होणारा खर्च कमी करण्यासाठी कामगारकपातीचे धोरण राबविण्याऐवजी अधिकाऱ्यांचे चोचले बंद करा. त्यांच्या गाड्या काढून घ्या. एवढे सहायक आयुक्त, उपायुक्त हवेच कशाला; खर्च कमी करण्यासाठी करण्यात येणारे आऊटसोर्सिंग हे भाजपच्या नेत्यांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोप मनसेने केला आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प वास्तववादी आणि पारदर्शीही नसून नागरिकांची दिशाभूल करणारा आणि विकासकामांवर परिणाम करणारा आहे. पारदर्शकतेचे पहारेकरी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर खुर्च्या टाकून झोपले आहेत, अशी परखड टीका भाजपचे नाव न घेता मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केली.

महानगरपालिकेचा अर्थसंकल्प यंदा 12 हजाराने कमी झाला आहे. खर्च कमी केला; कर मात्र तसाच ठेवला आहे. खर्च वाचविण्यासाठी कामाचे आऊटसोर्सिंग करायचे ठरवले आहे. त्यापेक्षा अधिकाऱ्यांचे चोचले बंद करा. त्यांच्या गाड्या काढून घ्या, अशी मागणी देशपांडे यांनी केली. अर्थसंकल्पात अपयशावर पांघरुण घालण्यासाठी आकड्यांचा खेळ करण्यात आला आहे. आयुक्त अजोय मेहता यांनी खर्च कमी करून विकासकामांमध्ये कपात केली आहे. हा अर्थसंकल्प नागरिकांची दिशाभूल करणारा असल्याने त्याला पालिकेत आणि रस्त्यावरही विरोध करू, असा इशारा देशपांडे यांनी आज दिला.

निवडणुकीपूर्वी शिवसेनेने मालमत्ता कर व भाजपने खड्डेमुक्त मुंबई होईपर्यंच रस्ते कर माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा अर्थसंकल्पात उल्लेखच नाही. या दोन्ही गोष्टींचा राज्य सरकारशी संबंध येतो; तरीही आश्वासन देऊन या दोन्ही पक्षांनी नागरिकांची दिशाभूल केल्याचे ते म्हणाले.

Web Title: mns comment on municipal