मनसेचे सात नगरसेवक 'कृष्णकुंज'वर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची "कृष्णकुंज' या निवासस्थानी भेट घेतली. शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मनसेने स्वबळावर महापालिका निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला होता. आता या पक्षाचे हे सात नगरसेवक महापौरपदासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे राज ठाकरे शिवसेना किंवा भाजपला साथ देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुंबईत अपक्ष नगरसेवकांची साथ लाभल्याने शिवसेनेचे संख्याबळ 87 वर पोहचले आहे, तर भाजपच्या पारड्यात 82 जागा आहेत. दोन्ही पक्षांमध्ये फारसे अंतर नाही. त्यामुळे बहुमतासाठी दोन्ही पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यातच मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी महापौरपदाच्या निवडीसाठी विशेष सत्र बोलावले आहे. 9 मार्चला मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे मनसेच्या नगरसेवकांचे मत कोणाच्या बाजूने, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज ठाकरे हे भाजपला आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू मानतात. त्याचप्रमाणे निवडणुकांपूर्वी मनसेने शिवसेनेकडे बिनशर्त युतीसाठी टाळी मागितली होती. त्यामुळे स्वाभाविकपणे मनसेचा कल शिवसेनेकडे असेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र शिवसेनेने युतीचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर राज ठाकरेंनी सेनेसोबत जाण्याचा मार्ग बंद केला होता. राज
ठाकरे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्यास किंवा महापालिकेत ते काय पवित्रा घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Web Title: mns corporator go to krishnakunj