रस्त्यांची स्थिती न सुधारल्यास उग्र आंदोलन - मनसे

सुचिता करमरकर
मंगळवार, 17 जुलै 2018

बावीस वर्षे सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात चलेजावचा नारा देत मोर्चेकऱ्यांनी मुंबई पालिका परिसर दणाणून सोडला. 
 

मुंबई - येत्या पंधरा दिवसांत पालिका क्षेत्रातील रस्त्यांची स्थिती सुधारली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पध्दतीने उग्र आंदोलन करणार असा इशारा आज काढण्यात आलेल्या पक्षाच्या मोर्चात पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना देण्यात आला. याच दरम्यान रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरील कारवाईची प्रक्रियाही याच कालावधीत केली जावी असेही सांगण्यात आले आहे. बावीस वर्षे सत्तेत असणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात चलेजावचा नारा देत मोर्चेकऱ्यांनी पालिका परिसर दणाणून सोडला. 

बैलबाजार परिसरातून हा मोर्चा निघाला. पक्षाचे सरचिटणीस राजन गावंड, प्रकाश भोईर, प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, काका मांडले, पालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे, गटनेते प्रकाश भोईर, पक्षाचे नगरसेवक, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, कल्याण शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई, डोंबिवली शहर प्रमुख मनोज घरत, महिला पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चेकऱ्यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी केला. अधिकाऱ्यांनी सामान्यतः नागरिकांबाबत संवेदना दाखवावी असेही यावेळी सांगण्यात आले. पालिकेतील अधिकाऱ्यांना केवळ कागदी घोडे नाचवायची सवय झाल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. सध्या शहरात रस्ते दुरुस्तीची कामे युध्द पातळीवर सुरु असल्याचे आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले. मोर्चात पालिकेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांचा तीव्र निषेध करणाऱ्या घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या. पावसाला न जुमानता कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.

मोर्चाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. मुन्ना कुमार, डी एस बागवे, साईप्रसाद बापू जोशी हे खड्ड्यांच्या अपघातात जखमी झालेले नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: MNS demanded for good road conditions in mumbai